रावेर नगरपालिकेवर विविध मागण्यांसाठी अपंग बांधवांचा मोर्चा

0

दिव्यांग सेना पदाधिकार्‍यांनी केले नेतृत्व

रावेर- अपंग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी रावेर नगरपालिकेवर दिव्यांग सेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. अपंग बांधवांच्या सर्व मागण्या मान्य न केल्यास पुढेही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोर्चेकर्‍यांकडून देण्यात आला तर नगरपालिकेतर्फे उपनगराध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी, नगरसेवक आसीफ मोहम्मद यांनी निवेदन स्वीकारून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. महालक्ष्मी मंदिरापासून दिव्यांग सेनेच्या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये तालुकाभरातील अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात त्यांनी अपंगांसाठी पाच टक्के निधी खर्च करण्याची मागणी केली असून प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला पालिकेने गाळा उपलब्ध करून द्यावा, नळपट्टी, पाणीपट्टी मध्ये 50 टक्के सूट द्यावी, दिव्यांगांसाठी क्रीडा स्पर्धा घेवून व्यायाम शाळा उपलब्ध करून द्यावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन अपंग बांधवांतर्फे पालिका व तहसील कार्यालयाला देण्यात आले. यावेळी भाजपाचे पद्माकर महाजन, उमेश महाजन, डी.डी.वाणी आदी रावेरचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.

यांचा होता मोर्चात सहभाग
यावेळी या मोर्चात दिव्यांग सेनाचे जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन, उपाध्यक्ष भरत जाधव, जळगाव शहराध्यक्ष शेख शकील मूकबधीर अध्यक्ष निलेश पाटील, रावेर तालुकाध्यक्ष ब्रिजलाल पाटील, शहराध्यक्ष ईश्वर महाजन, कार्याध्यक्ष महेश महाजन, नितीन महाजन, ललित वाघुळदे, राहुल कोल्हे, सोमनाथ माळी, पवन शिरनामे, संजय बुवा, प्रदीप परदेशी, प्रमोद महाजन, घनश्याम हरणकर, रमेश चौधरी, रजनीकांत बारी, संजय माळी यांच्यासह मोठ्या संख्येने अपंग बांधव सहभागी झाले होते.