रावेर तालुक्यात पुन्हा वादळाचा तडाखा

शेकडो हेक्टरवर केळी बागा भुईसपाट ; घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड : विद्युत तारा उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित

रावेर : रावेर तालुक्यात पुन्हा झालेल्या वादळी पावसाने केर्‍हाळा, अहिरवाडी, मोहगम, पिंप्री, मंगळूर, कर्जोदच्या शेती शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे विजेच्या तारा तुटल्या तर वीज पोलवर झाडे उन्मळून पडल्याने या भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे. शेकडो हेक्टरवरील केळी भुईसपाट झाली असून, अनेक घरांची पुन्हा पडझड झाली आहे. दरम्यान, आठवडे भरापूर्वी झालेल्या वादळी वार्‍यामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम अपूर्ण असताना पुन्हा अवकाळीने नुकसान केल्याने शेतकर्‍यांना सरसकट भरपाई मिळण्याची अपेक्षा आहे.

रावेर तालुक्यात निसर्ग कोपला
रावेर तालुक्यात केळीवर निसर्ग कोपला असून 27 व 29 मे व पुन्हा बुधवार, 2 जून रोजी मध्यरात्री आलेल्या वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे केर्‍हाळा, अहिरवाडी, मोहगम, परीसरातील केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर करोडो रुपयांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या. अनेक ठिकाणी वादळाच्या तडाख्याने झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. अहिरवाडी व मोहगम या रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या व वीजपुरवठा खंडित झाला. तालुक्यात बहुतांशी भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. मध्यरात्री अनेक न्याल्यांना पूर आल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

ना लोकप्रतिनिधी आले ; ना अधिकारी
केळी बागांवर निसर्ग कोपला असून रावेर तालुक्यात रात्री पुन्हा वादळी पावसाने हजेरी दिली व शेकडो हेक्टरवरील केळी भुईसपाट झाली. यापैकी रवींद्र महाजन (अहिरवाडी) यांच्या केळी बागाला सुध्दा रात्री झालेल्या पावसाचा फटका बसला. त्यांनी सांगितले की, नुकसान होऊन 12 तास उलटले परंतु अद्याप ना लोकप्रतिनिधी आले, ना प्रशासनाचे अधिकारी. नुकसानीची माहिती देतांना त्यांना अश्रु अनावर झाले तर लोकप्रतिनिधींचे केळी उत्पादक शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगून संदीप सावळे यांनी नाराजी व्यक्त केली.

पाच दिवस उलटूनही पंचनामेच सुरूच
रावेर तालुक्यात 27 व 29 मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील केळी भुईसपाट झाली असून अनेक घरांची पडझड झाली आहे. या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यापाठोपाठ मंगळवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी दौरा करून येऊन गेले. तरीसुध्दा पंचम्यांची कामे पूर्ण झाले नाहीत. यात ढिलाईपणा केला जात असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या पंचनामे संदर्भात कृषी अधिकारी भामरे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, पंचनामे आम्ही एकटेच करत नाही तर महसूल प्रशासन व कृषी विभाग संयुक्त नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करतात. लवकरच पंचमाने पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात तीन वेळा झाले नुकसान
रावेर तालुक्यात गेल्या आठवड्यात तीन वेळा वादळी पाऊस झाला आहे. तालुक्यातील 23 गावातील 949 शेतकर्‍यांचे 27 रोजी 757 हेक्टर क्षेत्रातील सुमारे 30 कोटी 30 लाख रुपयांच्या केळीचे नुकसान झाले होते. तर 29 झालेल्या चक्रीवादळात 14 गावातील 174 शेतकर्‍यांचे 189 हेक्टर क्षेत्रातील सात कोटी 56 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल आणि कृषी विभागाने व्यक्त केला आहे. 27 रोजी 512 घरांचे आणि 29 रोजी 86 घरांचे असे एकूण 598 घरांचे वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे.