रावेर तालुक्यातील भाजपेयी पक्षांतराबाबत संभ्रमात

0

रावेर (शालिक महाजन) : भाजपावर नाराज असलेले माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करतील अशी सर्वत्र चर्चा असतांना रावेर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी संभ्रमात आहेत. खडसेंसोबत जायचे की भाजपासोबत थांबायच यावर सद्यातरी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या मनात मंथन सुरू आहे.

पक्षांतरानंतर होणार अनेक उलथा-पालथ
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना मानणारा वर्ग रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. भाजपाचे रावेर पंचायत समितीत आठ सदस्य असून सभापतीदेखील आहे. सावदा नगरपालिकेत भाजपाचे नऊ नगरसेवक तर एक नगराध्यक्ष आहे. जिल्हा परीषदेचे चार सदस्य असून जि.प.अध्यक्षादेखील रावेर तालुक्यातीलच आहे. रावेर पालिकेत तीन नगर सेवक, बाजार समितीत आठ संचालक तर एक सभापतीदेखील भाजपा पुरस्कृत आहे.त्यामुळे तालुक्यात भाजपाची पकड चांगली असून अनेक महत्वाच्या संस्था भाजपाच्या ताब्यात आहे. यामध्ये अनेक पदाधिकारी माजी मंत्री खडसे गटाचे आहे. रावेर प्रतिनिधीने रावेर भाजपातील काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत त्यांचे मत जाणून घेण्याच्या प्रयत्न केला असता काही खडसेंसोबत दिसले तर काही भाजपा सोबत तर काहींनी खडसे भाजपाच सोडणार नसल्याचा ठाम विश्‍वास व्यक्त केला. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी खरच पक्षांतर केले तर रावेर तालुका भाजपात कशी आणि काय-काय उलथा-पालथ होते याकडे सर्वांचे लक्ष असेल. सद्या तरी सर्वांचे लक्ष माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या निर्णयाकडे लागले आहे.

माजी मंत्री खडसेंचा रावेरवर सुध्दा प्रभाव
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची मुक्ताईनगराप्रमाणे रावेर तालुक्यावर सुध्दा पकड आहे. पंचायत समिती, जिल्हा परीषद असो की नगरपालिका, बाजार समिती या प्रत्येक ठिकाणच्या महत्वाच्या पदावर नाव नियुक्तीसाठी स्थानिक भाजपा पदाधिकारी खडसे यांचा सल्ला घेऊनच नाव निश्चित करतात परंतु आता पुला खालून बरेच पाणी वाहून गेले असून खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर पुढील वर्षी तालुक्यात बाजार समिती, नगर पालिका, खरेदी-विक्री, जिल्हा बँक सारख्या संस्थाच्या निवडणुका असून येथे खडसे आपली माणसे निवडून आणण्यासाठी बराच प्रयत्न करतील.

तालुक्यात राष्ट्रवादीला मिळेल संजीवनी
तालुक्यात सद्या राष्ट्रवादीचे दोन पंचायत समिती सदस्य तर एक जिल्हा परीषद सदस्य आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादीत मराठा पुढार्‍यांचा बोलबाला राहिलेला आहे. तालुक्यात लेवा पाटील समाज मोठ्या प्रमाणात असून त्या खालो-खाल मराठा नंतर मुस्लिम बुध्दिष्ट नंतर बाकी अल्पसंख्य समाज आहे. खडसे राष्ट्रवादीत गेले तर लेवा समाजासह इतर अल्पसंख्यसमाज खडसे राष्ट्रवादीकडे वळविण्याची ताकद खडसे यांच्याकडे आहे. त्यामुळे तालुक्यात खडसेमुळे राष्ट्रवादीला चांगली ताकद मिळेल.

भाजपाला खिंडार रोखण्याची जबाबदारी
खडसे राष्ट्रवादीत गेले तर भाजपाला सर्वात मोठी जबाबदारी व टेंशन असेल ते आपले पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना भाजपा सोबत ठेवण्याची! आधीच भाजपामध्ये खडसे व महाजन गट तसेच भाजपावर प्रेम करणारे असे तिन्ही गट सक्रीय आहे. यासाठी खास आमदार गिरीष महाजन, आमदार राजू मामा भोळे हे स्वत: रावेर पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याशी जवळीक साधून संर्पकात आहे. भाजपाला तालुक्यात खिंडार पडू नये यासाठी व्यूहरचना असून खडसे जास्तीत-जास्त भाजपाला खिंडार पाडण्यासाठी जिव्हाळ्याच्या लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीत नेण्यासाठी प्रयत्न करतील यात शंकाच नाही.

Copy