रावेरात विनाकारण फिरणार्‍यांवर कठोर कारवाई

रावेर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सोमवारपासून शहर व तालुक्यात अतिशय कडकपणे लॉकडाऊन नियमांचे अंमलबजावणी केली जाणार आहे. शहरात विनाकारण फिरणार्‍यांवर महसूल, पोलिस व नगर पालिकेतर्फे संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी फळ व भाजीपाला विक्रेत्यांना नगर पालिकेने ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त आढळल्यास कडक दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिला आहे.

कडक अंमलबजावणीसाठी व्हीसीद्वारे बैठक
सोमवारपासून कडक लॉकडाऊन करण्यासाठी जिल्हा स्तरावरून शनिवारी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात व्हीसीद्वारे बैठक झाली. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, बीडीओ दीपाली कोतवाल, नगर पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन, डॉ.शिवराय पाटील, निंभोरा येथील सहा.पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिक कडक प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. शहरातील एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शहरातील विविध भागात पालिकेतर्फे यापूर्वीच 15 ठिकाणी जागा निश्चित करून दिल्या आहेत मात्र हे व्यावसायीक तेथे न बसता डॉ.आंबेडकर चौकात गर्दी करतात, असे निदर्शनास आले आहे. अशा विक्रेत्यांविरुद्ध सोमवारपासून पालिका प्रशासन व पोलिस विभागाची संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे उल्लंघण करणार्‍या विक्रेते, व्यावसायीक व नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यासह गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी लांडे यांनी दिला आहे.