रावेरात महापुरूषांच्या प्रतिमेचा अनादर

रावेरात गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील संतापजनक प्रकार : पालकांमधून तीव्र नाराजी

रावेर : पंचायत राज समिती (पीआरसी) दौरा तोंडावर असतांना रावेर गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेचा अनादर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्यालयात साने गुरुजींची प्रतिमा केव्हाही कोसळण्याची भीती असून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आलेली पुस्तके अस्ताव्यस्त ठेवण्यात आल्याने जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी लक्ष देण्याची गरज आहे. पंचायत राज समितीने देखील रावेर शिक्षण विभागाला भेट देण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार
पंचायत राज समितीचा दौरा दोन दिवसांवर आला असून जिल्हा परीषद, जळगाव ते पंचायत समिती, रावेरपर्यंत सर्व दूर स्वच्छता, कलर तसेच विविध विकासकामांच्या योजनेची पडताळणी सुरू असतांना रावेर स्थानिक गटशिक्षण विभागात मात्र पूज्य साने गुरूजींचा फोटो केव्हाही कोसळेल, अशी स्थिती आहे तर पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची पुस्तके अस्ताव्यस्त पडल्याने आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे. मुलांना स्वच्छतेचा संदेश देणारी शिक्षण व्यवस्थाच अस्वच्छतेच्या कोंडीत सापडली आहे. विशेष म्हणजे या कार्यालयात रोज गटशिक्षणाधिकारी येऊन बसतात परंतु त्यांना या गोष्टीचे जराही गांभीर्य दिसत नाही. या कार्यालयाला पंचायत राज समितीने भेट देण्याची मागणी सुज्ञ नागरीकांमधून व्यक्त होत आहे.

महापुरुषांच्या प्रतिमेचा अनादर
रावेर तालुक्यात शिक्षणाचे धडे देणार्‍या गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेचा अनादर होत आहे. ही गंभीर बाब आहे. येथे साने गुरुजी, मदर टेरेसा, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमा व्यवस्थितरीत्या लावणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. रावेर तालुका जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांचे होम-ग्राउंड असून त्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

फोटो पाहून खुप वेदना झाल्या
फोटो बघून मनाला खूप वेदना झाल्या. शिक्षण विभागातच पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेचा अनादर होणे निषेधार्थ आहे. आम्ही पालक वर्ग ही बाब पंचायत राज समितीकडे मांडणार आहोत तसेच फोटोत दिसत असलेली पुस्तके कार्यालयात ठेवण्याऐवजी गरीब विद्यार्थ्यांना द्यावीत, असे मत ज्येष्ठ समाजसेवक व साने गुरुजींचे विचारक प्रशांत बोरकर म्हणाले.

Copy