रावेरात बायोडिझेल विक्री : दोघांना अटक

रावेर पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई : तीन लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : कारवाईने उडाली खळबळ

रावेर : अ‍ॅपे रीक्षामध्ये रॉकेल मिश्रीत अवैधरीत्या बायोडिझेल विक्री करणार्‍या दोघांना रावेर पोलिसांनी अटक केली आहे. संशयीतांकडून तीन लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शे.शरीफ शे.मुस्लिम (38) व शे.फिरोज शे.मुस्लिम (27, दोन्ही रा.तिरुपती नगर, रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरात बायोडिझेलमध्ये रॉकेल मिश्रीत करून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बर्‍हाणपूर रोडवरील गोपी ट्रान्सपोर्ट अ‍ॅण्ड तोल काटा समोर तसेच फकीर वाडा भागात पाताळगंगा रोडवर गोडाऊनमध्ये कारवाई करण्यात आली. या ठिकाणी अ‍ॅपे रीक्षात तयार करण्यात आलेले अवैध डिझेल पंप जप्त करण्यात आले. या दोन्ही रीक्षांवर नावाजलेल्या कंपन्यांचे लोगो लावण्यात आले होते यामुळे ग्राहकांची दिशाभूल करून डिझेल विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचे होता. पोलिसांनी शे.शरीफ शे.मुस्लिम (38) व शे.फिरोज शे.मुस्लिम (27 , दोन्ही रा.तिरुपती नगर, रावेर) यांना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन हजार 705 लिटर रॉकेल मिश्रीत बायोडिझेल व अन्य साहित्य मिळून तीन लाख 67 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुरवठा निरीक्षक वाकोजी नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक मनोहर जाधव, उपनिरीक्षक मनोज वाघमारे, कॉन्स्टेबल जावरे, नाईक नंदू महाजन, नाईक महेंद्र सुरवाडे, कॉन्स्टेबल सचिन घुगे, एएसआय राजेंद्र करोडपती, प्रदीप सपकाळे, प्रमोद पाटील, सुकेश तडवी, महेश मोगरे, भागवत धांडे, पुरुषोत्तम पाटील, सुरेश मेढे, विशाल पाटील, मंदार पाटील, कुणाल पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.