रावेरकरांना दिलासा : करवाढ नसलेला शिलकी अर्थसंकल्प सादर

रावेर : रावेर पालिकेच्या विशेष सभेत कोणताही करवाढ नसलेला व शिलकी अर्थसंकल्पास सभागृहाने नुकतीच मंजुरी दिली. नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी मुख्यधिकारी रवींद्र लांडे उपस्थित होते. विशेष सभेत सन 2021-22 वर्षासाठी 37 कोटी 20 लाख 77 हजार 333 रुपये शिलकी अर्थसंकल्यास मंजुरी देण्यात आली.

करवाढ नसल्याने रावेरकरांना दिलासा
या अर्थसंकल्पात नगरपरीषद निधीची आरंभीची शिल्लक तीन कोटी 30 लाख 64 हजार 644 दर्शविण्यात आली असून 33 कोटी 90 लाख 12 हजार 689 महसूल जमा होणार असल्याने एकूण महसुलातून खर्च 33 कोटी 78 लाख 55 हजार 408 वजा जाता शिल्लक रुपये तीन कोटी 42 लाख 21 हजार 925 शिल्लक दर्शविण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात नागरीकांसाठी कोणतीही करवाढ दर्शविण्यात आलेली नाही. खर्चात काटकसर करून जास्तीत-जास्त चांगल्या सेवा पुरविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने वैशिष्ट्यपूर्ण योजनेत नवीन नगरपरीषद प्रशासकीय ईमारत बांधकाम खर्च एक कोटी व सभागृह बांधकाम खर्च एक कोटी 17 लाख त्याचप्रमाणे राज्य अग्निसुरक्षा अभियानांतर्गत अग्निशमन वहान खरेदी 30 लाख व पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रावेर शहरात जुनी व नवीन वाढीव भागासाठी खर्च 35 कोटी, स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक व वैयक्तिक शौचालये व स्वच्छतागृह बांधणे नागरी दलितवस्ती सुधारणा योजना अंतर्गत खर्च दोन कोटी तर रस्ता निधी अंतर्गत चार कोटी खर्च होणार आहे. त्याचप्रमाणे हद्दवाढ योजनेंतर्गत कामे करण्यासाठी सात कोटी 77 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन योजने अंतर्गत 3 कोटी.50 लाख रूपयांची तरतूद केली आहे. पंधरावित्त आयोगा अंतर्गत एक कोटी 57 लाख इतर खर्च कामासाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. नागरीकांना नगरपरीषदेचे कर हे ऑनलाईन भरणा करण्याकामी तसेच नगरपरीषदेच्या सूचना नागरीकांपर्यंत पोहोचविण्याकामी मोबाईल संदेश पोहचविण्याकामी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

Copy