रायसोनीत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

0

 जळगाव । जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील 2011 ते 2016 या कालावधीतील सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बहुतांश विद्यार्थी नोकरी आणि व्यवसायासाठी पुणे, मुंबई, नाशिक, सुरत इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोईसाठी पुणे येथील हॉटेल दी सेन्ट्रल पार्क याठिकाणी मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

जुन्या आठवणी झाल्या ‘ताज्या’
रायसोनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात हैदराबाद, बैंगलोर, अहमदाबाद, सुरत, नाशिक, मुंबई, पुणे, जळगाव, भुसावळ आदी ठिकाणाहून विद्यार्थी आले होते. विद्यार्थ्यांची भेट शिक्षक व त्यांच्या जुन्या मित्रांबरोबर झाल्याने एक वेगळा आनंद अनुभवायला मिळतो. तसेच कोणत्या विद्यार्थ्याने यशाची किती उंची गाठली आहे याचा परिचय होतो. काही विद्यार्थी नोकरी तर काही व्यवसाय करतात. त्यामुळे नवनवीन विषयांवर चर्चा घडून यावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या मेळाव्यामुळे आठवणी ताज्या झाल्यात व खूप आनंद झाला असे सांगितले. प्रसंगी विभागप्रमुख प्रा.राकेश तिवारी व प्रा.देवानंद तायडे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सोनल पाटील तर आभार प्रा.सुशांत सामलेटी यांनी मानले.