राम मंदिरासाठी आरएसएस, विहिपची ‘हुंकार’सभा

0

नागपूर : देशभरात राम मंदिराचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलुरू तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जाणार आहे. या सभेसाठी संघ परिवारातील संघटनांनी कंबर कसली आहे. या सभेत विविध संत सहभागी होणार आहेत. मात्र मंचावर संघाचे पदाधिकारी राहणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

राममंदिरासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी अयोध्या, बंगळुरू व नागपुरात हुंकार सभा होणार आहेत. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने येथून देशात संदेश जाणार आहे.

२५ नोव्हेंबर रोजी हनुमान नगर येथील क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ही सभा होणार आहे. या सभेत शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती, साध्वी ऋतुंभरा देवी, श्रीदेवनाथ मठ (सुर्जी-अंजनगाव) श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज तसेच विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

मात्र या सभेला मंचावर संघाचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी उपस्थित राहतील की नाही हा प्रश्न आहे. याबाबत संयोजकांनीदेखील नेमकी भूमिका उघड केलेली नाही. या ‘हुंकार’ सभेला तरुणाई जास्तीत जास्त प्रमाणात यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अभाविप, भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. दररोज विविध पातळ्यांवर बैठका सुरू आहेत व दररोज तयारीचा आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे शहरातील विविध मंदिरांच्या परिसरातदेखील जागरण सत्र आयोजित करण्यात येत आहे.