राम मंदिरबाबतचे वादग्रस्त विधान भाजप आमदाराला भोवले

0

हैदराबाद । अयोध्यामध्ये राम मंदिर बांधण्यावरून वादग्रस्त विधान करणारे भाजपचे आमदार राजा सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर कोणी राम मंदिर बांधण्याचा विरोध केला, तर त्याचा शिरच्छेद करू, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले होते.

हैदराबादमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजपाचे आमदार राजा सिंग म्हणाले होते की राम मंदिर बांधल्यास गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल, असे म्हणणार्‍यांना मी सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या अशाच विधानाची वाट पाहत होतो, जेणेकरून आम्ही तुमचा शिरच्छेद करू शकतो.’ सिंग यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. याबाबत मजलिस बचाओ तेहरीक या स्थानिक संघटनेचे अध्यक्ष अमजेद उल्लाह यांच्या तक्रारीवरून हैदराबाद पोलिसांनी राजा सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिथावणीखोर आणि धार्मिक भावना भडकावणारे विधान केल्याबद्दल आयपीसी 295- नुसार त्यांच्यावर डाबिरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही राजा सिंग यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत. राजा यांनी मध्यंतरी फेसबुकवर व्हिडिओ टाकून दलितांना मारहाण करण्याचे समर्थन केले होते. जे दलित गोमांस खातात आणि गायींची हत्या करतात त्यांना अशाच प्रकारे मारहाण केली जावी, असे ते म्हणाले होते.