रामदेव वाडीतील तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू

जळगाव – तालुक्यामधील वावडदा शिवारातील शेतात ट्रिलरचे काम करीत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने
त्या खाली दबून रामदेव वाडीतील चालकाचा बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास जागीच मृत्यू झाला.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. रामदेव वाडीतील कैलास तुकाराम राठोड (वय 20) हा आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. तो वावडदा शिवारामधील स्वत:च्या शेतात आई मुन्नाबाई, वडील तुकाराम गंगाराम राठोड व मोठे काका सीताराम गंगाराम राठोड यांच्यासह सकाळी 10 वाजता ट्रॅक्टरने कामावर गेला. तो शेतात ट्रॅक्टरने टिलरचे काम करीत होता. बंधार्‍यावरुन वळण घेत असताना ट्रॅक्टर कलंडले. तरुणाच्या पोटावरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच शेतात काम करणारे आई, वडील व काका यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत कैलासचा मृत्यू झाला होता. परिसरातील शेतकर्‍यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महा विद्यालयाच्या रुग्णालयात आणला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राठोड करीत आहेत.