Private Advt

रामजी की निकली सवारी…!

कार्तिकी एकादशीनिमीत्त श्रीराम रथोत्सवासाठी भाविकांची मांदीयाळी ; पालकमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

जळगाव – सियावर रामचंद्र की जय अशा गगनभेदी जयघोषात सनई, चौघड्याच्या निनादात कार्तीकी एकादशीनिमीत्त श्रीराम मंदिर संस्थानचा श्रीराम रथोत्सव कोरोनाच्या सावटामुळे तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आज मोठ्या चैतन्यमय वातावरणात पार पडला. यंदा प्रशासनाकडून रथोत्सवाला वेळेचे बंधन घालून देण्यात आले असल्याने रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची सकाळपासूनच मांदियाळी होती. त्यामुळे रथोत्सवाच्या मार्गाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होवून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
जगात असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे गेल्या दोन वर्षांपासून कार्तीकी एकादशीला निघणारा श्रीराम मंदिराचा निघणार श्रीराम रथोत्सवाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र यंदा कोरोनाचे सावट कमी झाल्याने प्रशासनाकडून श्रीराम रथोत्सवाला वेळेचे बंधन घालीत परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आज कार्तीकी एकादशीला जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्री राम मंदिर संस्थांतर्फे श्रीराम रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

रथ अन् उत्सवमुर्तीची महापुजा


आज पहाटे 4 वाजता काकडा आरती व प्रभू श्रीरामांच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता श्री राम मंदिर संस्थांनचे विश्‍वस्त गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या उपस्थितीत हभप श्रीराम महाराज जोशी यांच्या हस्ते शारदा वेद पाठशाळा व शहरातील समस्त ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या घोषात रथाची व उत्सवमुर्तीची महापुजा करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. उन्मेष पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. चंदूलाल पटेल, महापौर जयश्री महाजन भोळे, मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी, माजी महापौर भारती सोनवणे, नितीन लढ्ढा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, पिपल्स बँकेचे संचालक भालचंद्र पाटील, माजी उपमहापौर डॉ. सुनिल खडके, नगरसेवक कैलास सोनवणे, विरेन खडके, दीपक जोशी, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, भारती सोनवणे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होतेे. यावेळी श्रीराम मंदिर संस्थांनतर्फे मान्यवरांसह रथाला मोगरी लावणार्‍यांचा उपरणे देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व भाविकांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजेच्या सुमारास रथाची महाआरती होवून प्रभू श्रीराम नामाच्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर शहरात जूने जळगाव, सराफ बाजारातील महालक्ष्मी मंदिर, बालाजी मंदिरात पानसुपारीचा कार्यक्रम होवून सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीला पाखली ठेवून वाजत गाजत त्याची महाआरती होवून श्री राम रथोत्सवाची सांगता करण्यात आली.

रथाला 149 वर्षाची परंपरा


वारंकरी संप्रदायाचे कान्देशातील थोर संत व श्रीराम मंदिर संस्थानचे मुळ सत्पुरुष श्री अप्पा महाराज यांनी सन 1872 साली हिंदू समाजातील अठरा पगड जाती, एकत्र करून हया रथोत्सवाच्या सोहळयाला प्रारंभ केला होता. 149 वर्ष पूर्ण झाली असून जळगावकरांच्या असंख्य भाविकांच्या सहकार्याने हा रथोत्सव नंदादिप अखंडपणे तेवत आहे. रथोत्सवाकरिता अवघ्या महाराष्ट्र भरातून असंख्य भाविक प्रभु श्रीरामांच्या दर्शनसाठी जळगावात येत असल्याने जळगावाला प्रतिपंढरपुरचे स्वरुप प्राप्त होत असते. कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला निघणारा जळगावच्या श्रीराम मंदिर संस्थानचा एकमेव रथोत्सव असून या रथोत्सवाला 149 वर्षांची अखंड परंपरा लाभली आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे रथोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला मात्र यंदा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर रथोत्सव पुन्हा भक्तीमय वातावरणात साजरा होत असल्याचे श्रीराम मंदिर संस्थानचे विश्‍वस्त तथा मंदिराचे पाचवे वंशज हभप मंगेश महाराज जोशी यांनी सांगितले.

हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन
ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या प्रभु श्रीरामचंद्राचा रथोत्सवात रथोत्सव समितीकडून रथोत्सवाचे संस्थापक श्री अप्पा महाराज यांचे परममित्र लालशाह बाबा यांच्या भिलपुरा चौकातील समाधी स्थाळावर चादर चढविण्यात आली. तर त्याठिकाणाच्या मुस्लिम समाजबांधवातर्फे रथाचे स्वागत करण्यात येत असल्याने जळगावाच्या रथोत्सवाला हिंदु-मुस्लिम समाजबांधवाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो.

लहान रथाचे विशेष आकर्षण
रथोत्सवानिमीत्त शहरातून निघणार्‍या प्रभू श्रीराम चंद्रांचा रथ काढण्यात येत असतो. दरम्यान विठ्ठलपेठ रथोत्सव मित्र मंडळातील चिमुकल्यांनी सुमारे 5 फुट उंचीचा मोठ्या रथाची हुबेहुब प्रतिकृती तयार केली असून त्याची रथाच्या अग्रभागी रथाच्या मार्गावर फिरवण्यात आला. त्यामुळे रथोत्वात रथाच्या पुढे असलेले लहान रथ याठिकाणी रथोत्सवात विशेष आकर्षण ठरले होते.

पंचक्रोशीतून भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी
भगवे ध्वज, झेंडू, शेवंती अन गुलाबांच्या फुलांच्या माळा, आंब्यांच्या पानांचे तसेच नारळांचे तोरण, आकर्षक रोषणाई, केळीचे खांब अन ऊसाची मोळी लावून रथ सजविण्यात आला होता. तसेच सजलेल्या भव्य-दिव्य रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच रथाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
सोंगांच्या सवाद्य मिरवणुकीने वेधले लक्ष
रथोत्सवात भवानी मातेचे रुप मानल्या जाणार्या सोंगाकडून अध्यात्माचा प्रचार केला जात असतो. प्राचीन काळापासून वर्षानुवर्षापासून सुरु असलेल्या या लोककलेतून महिषासुरमर्दिनीच्या रुपातील सोंगाची सवाद्य मिरणवणुक काढली जाते. यात ढोल ताश्यांच्या गजरात शहरातील चौकात सोंगे नाचत होती. या सोंगांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
परिसराला यात्रेचे स्वरुप
दोन वर्षांपासून कोरोनामुळे रथोत्सवाला खंड पडला होता. मात्र यंदा प्रशासनाने रथोत्सवाला परवानगी दिल्यानंतर रथोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे. तसेच यंदा सायंकाळी 6 वाजेपर्यंत रथोत्सवाला परवानगी देण्यात आली असल्याने रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक आले होते. त्याचप्रमाणे चौकाचौकांमध्ये खेळणे विक्रीची दुकाने थाटली असल्याने तब्बल दोन वर्षानंतर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
भजनाच्या तालावर भाविकांनी धरला ठेका
रथोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर रथाच्या अग्रभागी संत मुक्ताइबाईची पालखी, सनई चौघडा, नगारा, चोघडा गाडी, बँड पथक, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ, ओम साई गु्रप भजनी मंडळांकडून भक्तीगीत व भजन सादर करीत असल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भाविकांनी भजनाच्या तालावर ठेका धरला होता.