राफेलबाबत मोदींना क्लिन चिट देऊन पवारांचा दुटप्पीपणा – प्रकाश आंबेडकर

0

सोलापूर : राफेल करारावरून देशात गदारोळ माजला असून यामध्ये काँग्रेसने घेतलेली भूमिका योग्य आहे, मात्र शरद पवारांनी मोदींना याकरारावरून क्लिन चिट देऊन दुटप्पीपणा दाखवला आहे अशी जोरदार टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केली. वंचित बहुजन आघाडीची विराट सभा सोलापुरातील पार्क मैदानावर पार पडली त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले. एकीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींवर राफेल करारावरून आरोप करत असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी लोकांना नरेंद्र मोदींच्या उद्देशावर शंका नाही असे म्हटले होते. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी ही भूमिका मांडली.

प्रकाश आंबेडकर यांनी मात्र याच वक्तव्याचा आधार घेत राफेल करारावरून शरद पवारांनी मोदींना क्लिन चिट दिल्याचा आरोप केला. एवढंच नाही तर शरद पवारांनी आपण कसे दुटप्पी आहोत हे दाखवून दिल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्ला चढवला. न खाऊंगा न खाने दुंगा म्हणणारे मोदी सरकार एक दुसऱ्याला खाऊ घालत आहेत. काँग्रेसवाले सरळ सरळ खात होते असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी सभेत केला.

मी नाशिकमध्ये राफेल विमान कराराबाबत बोललो त्यानंतर काँग्रेसने आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र शरद पवार म्हणतात यात काहीही गडबड नाही. हे वक्तव्य करून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा अपमानच केला. आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसाठी कोण निर्लज्जपणा करणार हे पाहता येईल असाही टोला त्यांनी लगावला.

देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली तरीही देशातील धनगर, आदिवासी, शेतकरी आणि दलितांचे प्रश्न आहे तसेच आहेत. राज्य घटनेची अंमलबजावणी करणारे लायक नसतील तर तळागाळातील लोकांना न्याय मिळत नाही. याआधीही जे झाले तेच आत्ता होत आहे. राज्यघटनेची प्रभावी अंमलबजावणी सोडून हे मनुवादी सराकर संविधान बदलण्याचा खेळ करते आहे. हे देशासाठी धोकादायक असल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले. एवढेच नाही तर आमचे हात कोणत्याही घोटाळ्यात अडकलेले नाही असा दावा करणाऱ्या सरकारचे तोंड राफेल विमान घोटाळ्यामुळे काळे झाल्याचीही टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Copy