राणेंनी भाजपमध्ये जावे

0

पुणे । केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले रविवारी पुण्यात आले होते. त्यांनी पक्षाच्या पदधिकार्‍यांची भेट घेतली तसेच पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना, नारायण राणे यांनी भविष्य उज्ज्वल करण्यासाठी भाजपमध्ये जावे, असा मैत्रीपूर्ण सल्ला दिला. काँग्रेसमध्ये आता कोणाचेही भले होणार नाही. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर भाजपमध्ये जावे, असेही ते म्हणाले. त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलावे, असा मार्ग दाखवायला ते विसरले नाहीत.

आरपीआयला दलितेतर मतदार नाही

आरपीआयला दलितांशिवाय अन्य मतदार नसल्याची खंत रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील पक्ष उभा करण्यात अपयश आल्याची निराशा त्यांनी यावेळी बोलून दाखवली. दलितांना निवडून यायचे असेल तर सर्व पक्षीय मते मिळवली पाहिजेत. त्यामुळे सर्व जातीच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याशिवाय पर्याय नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात 13 टक्के दलित समाज असून त्यापेक्षा जर अधिक असता तर आरपीआयचा मुख्यमंत्री होऊ शकला असता, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

यापुढे मित्रपक्षांवर विसंबून राहणार नाही
महाराष्ट्रात काही ठिकाणी आरपीआयच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. तिथे भाजप आणि शिवसेनेला मात्र भरभरून मते मिळाली. त्यामुळे यापुढे केवळ मित्र पक्षांवर विसंबून न राहता पक्षाची बांधणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र विजय मिळाल्यावर त्यांना परत पक्षात घेण्यात आले, याबाबत विचारले असता त्यांनी कमळ सोडून दुसर्‍या चिन्हावर उभे राहिले असते तर काय झाले असते माहिती नाही, असे सूचक वक्तव्य केले. मात्र माझा कार्यकर्ता भाजपमध्ये जाणार नाही, याची खात्री आहे, असे असले तरी दुसर्‍यांच्या चिन्हावर निवडणूक लढवणे हा शाश्‍वत उपाय नसल्याचेही ते म्हणाले. उपमहापौर नवनाथ कांबळे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

ब्राह्मण समाजाला आरक्षण द्यावे
आरक्षणामुळे ब्राह्मण परदेशात जात आहेत, या महापौर मुक्ता टिळक यांच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले. ब्राह्मण समाजाला आरक्षण द्यावे, अशी माझी कायम मागणी होती. इतर जातींच्या आरक्षणाला धक्का न लावता ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले तर ते देश सोडून जाणार नाहीत, असे ते म्हणाले. मात्र, महापौर काहीही म्हणत असल्या तरी भाजपचा आरक्षणाला विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमचे आरक्षण घालवायचा प्रयत्न केला तर सगळ्यांचे जाईल, पण आमचे जाणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.