राणीपूर येथे आरोग्य केंद्राचे काम अपूर्णावस्थेत

0

शहादा:तालुक्यातील राणीपूर येथे जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्मितीचे काम सुरू आहे. हे काम अपूर्णावस्थेत असतानाही जिल्हा परिषदेच्या विद्यमान सत्ताधाऱ्यामार्फत त्याच्या उद्घाटनाचा घाट  घालण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या रुग्णालयात अनेक सुविधा अपूर्णावस्थेत असतानाही सत्ताधारी याच्या उद्घाटनाची घाई का करत आहे, असा प्रश्न आ. राजेश पाडवी यांनी उपस्थित केला आहे.

सुविधा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज

शहादा-तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी यांनी राणीपूर येथील नविन  प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली असता तेथे अनेक सुविधांचा अभाव आढळून आला. आरोग्य केद्रात लाईट फिटीग केली आहे. परंतु वीज कनेक्शन व वीज मिटर वीज महावितरण कंपनीकडून घेण्यात आलेले नाही. तसेच दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा करण्यासाठी पाण्याची टाकी ठेवण्यात आलेली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असलेल्या  डाॅक्टर व नर्स आरोग्य सेवक स्टाॅप नेमलेला नाही. आ. पाडवी यांनी याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करत आवश्यक त्या सर्व सुविधांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या.आरोग्य केंद्र अपूर्ण अवस्थेत असल्याने कोणत्याही प्रकारची उद्घाटन करण्याची घाई करु नये, सर्व बाबींची पूर्तता करूनच उद्घाटन करावे, अशी गावक-यांची मागणी असल्याने आरोग्य विभागाने याची तत्काळ पूर्तता करावी.
जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाने अपूर्णअवस्थेत असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले तर ते  परिसरातील गावकऱ्यांसाठी निरूपयोगी ठरणार असल्याने सर्वप्रथम सर्व सुविधा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
यावेळी आ. राजेश पाडवी यांच्या सोबत प्रांत अधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, विरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, सुखलाल रावताळे, सचिन पावरा, कमल पावरा, हितेश मेडीकर उपस्थित होते.

Copy