Private Advt

राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार : पोलिसांच्या या आहेत अटी !

औरंगाबाद : राज्यात भोंग्यावरून वातावरण तापले असतानाच 1 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा औरंगाबाद येथे होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे आता लागले आहे. या सभेला अखेर परवानगी मिळाली असून अनेक अटी शर्थींनंतरच ही परवानगी मिळाली आहे.

इशार्‍यानंतर तापले ‘राज’कारण
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढा नाहीतर समोरच हनुमान चालिसा लावू अशाप्रकारचा इशारा दिल्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे औरंगाबादमधल्या सभेला राजकीय पक्ष, संघटनांकडून विरोध करण्यात येत होता. ठाकरे प्रक्षोभक भाषण करुन तेढ निर्माण करुन सामाजिक शांतता बिघडवतील अशा प्रतिक्रिया विरोधकांकडून येत होत्या. मात्र तरीही मनसे कार्यकर्त्यांकडून सभेची जोरदार तयारी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांचीही भेट मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. यानंतर औरंगाबाद पोलिसांकडून अटी शर्थींसह परवानगी देण्यात आली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर ही सभा होणार असून पोलिसांनी सभेसाठी मोठा बंदोबस्त लावला आहे. ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण करू नये, अशी अट पोलिसांकडून घालण्यात आली असून सभेआधी तशी नोटीस त्यांना दिली जाणार आहे. या सभेच्या ठिकाणाची मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पाहणी केली आहे तसेच ठरलेल्या वेळी, ठरलेल्या जागी व ठरलेल्या दिवशीच ही सभा होईल अशी माहितीही नांदगावकर यांनी दिली आहे.

या आहेत अटी – शर्थी?
ध्वनी प्रदूषण नियम पाळणे गरजेचे.
कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली जावी
1 मे हा महाराष्ट्र दिन असल्याने धर्म, प्रांत, वंश, जात अशा कोणत्याही मुद्द्याविषयी वक्तव्य करु नये.
कोणत्याही व्यक्तीचा, समुदायाचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी.
सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन होणार नाही याची काळजी घ्यावी.
सभेपूर्वी व नंतर गाड्यांची रॅली, मिरवणूक काढता येणार नाही.
लहान मुलं, महिला, वृद्ध यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
सामाजिक सलोखा बिघडले असे वर्तन करु नये.
सामाजिक वातावरण बिघडेल अशा घोषणा लोकांनी देऊ नयेत