राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवली भाजप-मनसे युतीची लिंक

मुंबई : भाजपा आणि मनेसे युतीबाब राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र युती करतांना मनसेचा परप्रांतीयांसदर्भात असलेल्या भूमिकेवर नेहमी प्रश्न उपस्थित होतात. तसेच यापुर्वी मनसेने परप्रांतीयांविरोधातील भूमिका बदलली तर भाजप त्यांना सोबत घेऊ शकतो. राज हे आश्वासक आहेत. युतीबाबतचा निर्णय पक्षीय पातळीवर विचारांती होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांनी राज ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. दरम्यान, परप्रांतीयांसंंबधी घेतलेल्या भूमिकेसंबंधीचा गैरसमज दूर करण्यासाठी राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांना एका मुलाखतीची लिंक पाठवली आहे.

राज ठाकरे यांच्या मनसेची परप्रांतीयांची भूमिका अतिशय आक्रमक राहिलेली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा परप्रांतीयांना चोप दिला आहे. त्यामुळेच भाजपनं मनसे सोबतच्या युतीवरून सावध पवित्रा घेतला आहे. नाशिक भेटीत राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत मनसेच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर चर्चा झाली. ‘तुमच्या मनातील संभ्रम लवकरच दूर करतो. परप्रांतीयांची भूमिका स्पष्ट करणाऱ्या मुलाखतीची लिंक लवकरच तुम्हाला पाठवतो,’ असं राज यांनी पाटील यांना सांगितलं होतं.
चंद्रकांत पाटील यांच्या मनातील गैरसमज आणि संभ्रम दूर कपण्यासाठी राज यांनी त्यांना एका मुलाखतीची लिंक पाठवल्याचं समजतं. सध्या पाटील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी साताऱ्यात आहेत. त्यांनी अद्याप राज यांनी पाठवलेली लिंक पाहिलेली नाही. मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय भाजप नेतृत्त्वाकडून घेण्यात येणार आहे.

मनसेसोबतच्या युतीबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणतात…

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही या युतीबद्दलच्या चर्चांवर भूमिका मांडत भारतीय जनता पक्षाची बाजू स्पष्ट केली आहे. मनसेसोबत युती करण्याबाबत काही चर्चा झाली का अशी विचारणा करण्यात आल्यावर फडणवीस यांनी स्पष्ट नकार दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची याबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला मनसेचे विचार पटत नाहीत. भारतीय जनता पार्टीने भाषेच्या आधारावर कधीही भेदभाव केला नाही. असा भेद आम्हाला मान्य नाही. त्यामुळे मनसे आणि भाजपा यांची विचारधाराच जुळत नसल्याने युतीचा कोणताही विचार नाही.

 

Copy