राज्य सरकार विरोधात भाजपचे नंदुरबारमध्ये आंदोलन

0

तळोदा: राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात  राज्य शासन अपयशी ठरले असल्याचे आरोप करत भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. भाजपने  मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन छेडले आहे.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही हातावर पोट असलेल्यांसाठी स्वतंत्रपणे पॅकेज जाहीर करावे, ही पक्षाची प्रमुख मागणी आहे. गावोगावी अनेक अडचणी आहेत. गरीबांचे, मजूरांचे, शेतकऱयांचे अनेक प्रश्न आहेत. कोणत्याही प्रश्नावर राज्य सरकार ठाम भूमिका घेत नाही. केंद्र सरकारने चिंता करायची आणि राज्याने काहीच करायचे नाही, अशी स्थिती आहे. देशभरातील कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत व राज्यातील संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील रुग्णसंख्या देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने अजूनही काही पॅकेज जाहीर केलेले नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याऐवजी त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल, असा गाफीलपणा महाविकास आघाडी शासनाकडून सुरू आहे असे आरोप करण्यात आले आहे. आंदोलनाच्या निवेदनावर भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी,आमदार राजेश पाडवी,नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक हेमलाल मगरे, रामानंद ठाकरे,नगरसेवक योगेश पाडवी,आदिवासी युवा मोर्चा आघाडी अध्यक्ष राजु पाडवी, आदिवासी आघाडी प्रदेश सदस्य कांतिलाल पाड़वी,तालुकाध्यक्ष शिरीष माळी,जालंधर भोई, रमेश पाटील, शहर सरचिटणीस कौशलकुमार सवाई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Copy