राज्य सरकारला महिलांच्या सुरक्षेचे भान नाही – चित्रा वाघ

0

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले. महिलांचे स्थान पुरूषांच्या बरोबरीने असताना राज्यात महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढत चालले आहे. महिला, मुलींवर अत्याचार होत आहेत. याचे भान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहिलेले नाही. महिलांच्या सुरक्षेविषयी राज्यातील भाजप सरकार अतिशय असंवेदनशील आहे, अशा शब्दांत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकारवर टिका केली.

कचरा वेचक महिलांचा साडीचोळी देवून सत्कार..

भोसरी विधानसभा मतदार संघ, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा तथा महिला सोशाल मिडीया शहराध्यक्षा मनिषा गटकळ यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा वेचक महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यशस्वी अभियान महाराष्ट्र राज्याच्या समन्वयक वैशाली मोटे, पिंपरी-चिंचवड शहाराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैषाली काळभारे, पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, प्रवक्ते फजल शेख, कर्जत जामखेड मतदार संघाचे निरीक्षक किशोर मासाळ, महाराष्ट्र प्रदेशचे कार्यकारणी सदस्य सुरेश भोसले यांची उपस्थित होती.

महिलांवरील अत्याचार, छेडछाडीचे प्रकार वाढले…

चित्रा वाघ म्हणाल्या की, महिलांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय महिलांना स्थान आणि मान मिळत नाही. शरद पवार यांनी महिलांना 50 टक्के आरक्षण दिले. महिलांनी प्रगती करावी, आपला वेगळा ठसा उमटवावा. महिला पाठीमागे राहिल्या तर त्यांच्यावरील अन्याय-अत्याचार वाढत जाणार आहेत. आज महिलांचे स्थान पुरूषांच्या बरोबरीने असताना देखील पुरूषी मानसिकता ते मानायला तयार नाही. त्यामुळे महिलांवरील अत्याचार, छेडछाडीचे प्रकार वाढत चालले आहेत. त्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यातील भाजप सरकार अतिशय असंवेदनशील आहे, असेही वाघ म्हणाल्या.

Copy