राज्य सरकारचा रिमोट कंट्रोल सुरु!

0

मुंबई – मुंबई पालिका महापौर , उपमहापौर व विविध समित्या आणि विरोधी पक्षामध्ये बसणार नाही अशी घोषणा भाजपाने केली मात्र भाजपाने आतापासूनच शिवसेनेला चाप लावायला सुरुवात केली आहे नवीन पालिका सभागृह बसेपर्यंत समिती बैठकीत कोणताही धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेतला जाऊ नये हे राज्य सरकारचे परिपत्रक आड आल्याने सोमवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत अनेक प्रस्ताव मंजूरीविना परत पाठवावे लागले. विद्यमान नगरसेवकांची मुदत अद्याप संपलेली नसताना अशा प्रकारचे परिपत्रक काढल्याने विद्यमान नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. असे परिपत्रक काढून राज्य सरकारला साध्य काय् करायचे आहे, असा संतप्त सवालही सदस्यांनी विचारला. दरम्यान पालिकेच्या कामांवर आतापासूनच राज्य सरकारचा पहारा सुरू झाला की काय, अशी चर्चा पालिकेत रंगली होती.

पालिकेच्या जुन्या सभागृहाची मुदत 8 मार्चपर्य्ंत असून नवीन सभागृह 9 मार्चपासून सुरू होत आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांना कालावधी संपेपर्यंत समित्यांच्या बैठकीत हजर राहणे आवश्यक आहे. पालिका निवडणुकीच्या कालावधीतही समित्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यावेळी आचारसंहिता असल्याने विकासाच्या प्रस्तावावर निर्णय घेता येत नव्हता. मात्र 23 फेब्रुवारीला निवडणूक निकाल लागल्यानंतरही विद्यमान नगरसेवकांना प्रस्तावावर निर्णय घेता येत नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सोमवारच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी आले असताना अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी जोपर्यंत नवीन सभागृह चालू होत नाही तोपर्यंत पहिल्या आचारसंहितेनुसार कोणताही धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेतला जाणार नाही हे राज्य सरकारचे परिपत्रक वाचून दाखवले. या परिपत्रकानुसार समितीच्या बैठकीत प्रस्तावावर निर्णय न घेता परत पाठवावे लागले. अशा प्रकारचे परिपत्रक काढून सरकारला काय साध्य करायचे आहे. आमचा कालावधी अद्याप संपलेला नाही. त्यामुळे बैठकीत प्रस्तावावर चर्चा करणे आमचा अधिकार आहे. निर्णय घेता येणार नाही मग आम्हाला कशाला बोलावले असा सवाल विरोधीपक्षनेते प्रवीण छेडा यांनी विचारला. बैठकीत इतर सदस्यांनीही या परिपत्रकाबाबतम नाराजी व्यक्त केली. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनीही बैठकीत निर्णय घेतला जाणार नव्हता, मग सभा कशासाठी लावली. शिवाय अशा प्रकारचे प्रस्ताव कशाला आणले असा प्रश्न प्रशासनाला विचारला. विद्यमान नगरसेवकांच्या भावना आयुक्तांपर्यंत पोहचवाव्यात अशा सूचनाही फणसे यांनी यावेळी केल्या.