राज्य सरकारकडून खाजगी लॅबला दणका: कोरोना टेस्टच्या शुल्कात 50 टक्के कपात

0

मुंबई: कोरोनाने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. दररोज हजारो कोरोना टेस्ट होत आहेत. दरम्यान महाराष्ट्र सरकारने करोना चाचणीच्या शुल्कासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करोनाचे निदान करणाऱ्या चाचणीचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे होते. आयसीएमआरने निश्चित केलेले ४५०० हे शुल्क रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. या निर्देशानुसार ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, करोना चाचणीच्या दरात ५० टक्क्यांनी कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे खासगी लॅबला दणका बसणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आयसीएमआरने सर्व राज्यांना करोना चाचणीचे दर निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने हे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून अन्य तीन सदस्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा समावेश होता. या समितीनं करोना चाचणीच्या सुधारित दरांच्या संदर्भातील अहवाल सरकारकडे सूपुर्द केला होता.

व्हीटीएमच्या माध्यमातून हॉस्पिटलमधून स्वॅब घेतल्यास २२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपये शुल्क असेल. पूर्वी हॉस्पिटलमधून स्वॅब ४५०० शुल्क आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास ५२०० रुपये इतकं शुल्क रुग्णाला द्यावे लागत होते,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात आतापर्यंत सहा लाखाहून अधिक करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात एकूण ५५५ प्रयोगशाळा असून राज्यात ८८ प्रयोगशाळांच्या माध्यमातून वेगाने चाचण्या केल्या जात आहेत. सुरुवातीला खासगी प्रयोगशाळांच्या चाचणीचे अहवाल मिळण्यास तीन ते सहा दिवस लागायचे मात्र आता हे अहवाल चोवीस तासाच्या आत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. देशात आज घडीला दर दहा लाख लोकांमागे २३६३ करोना चाचण्या केल्या जातात तर राज्यात हेच प्रमाण दहा लाख मागे १३,००० एवढे आहे.

Copy