राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत मुंबई शहराने मारली बाजी

0

औरंगाबाद : 7 जानेवारीपासून सुरू असलेल्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत महिला व पुरुष वर्गात सर्वसाधारण विजेतेपद मुंबईच्या संघाने प्राप्त केले. तर कोल्हापूर परिक्षेत्राचे विपीन ढवळे आणि जयश्री बोरगी यांनी चमकदार कामगिरी करीत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब पटकावला. सातार्‍याच्या विपीनने अमरावतीच्या शोएब सय्यद याने 2006 साली नोंदविलेल्या 10.6 मिनिटांच्या विक्रमाची बरोबरी करीत सर्वांना आश्‍चर्यचकित केले. जयश्रीने 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

विजेत्यांना पुरस्काराचे वितरण
जयश्री आणि विपीन या दोघांना दुचाकी बक्षीस देण्यात आली. याशिवाय कोल्हापूर परिक्षेत्राच्या बास्केटबॉल पुरुष संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. सर्वसाधारण विजेतेपद पुरुष प्रथम – मुंबई शहर, द्वितीय-राज्य राखीव पोलिस दल परिक्षेत्र आणि तृतीय-कोल्हापूर परिक्षेत्र. महिला प्रथम – मुंबई शहर, द्वितीय-कोल्हापूर परिक्षेत्र आणि तृतीय प्रशिक्षण संचालनालय. सर्व विजेत्यांना राज्यपाल विद्यासागर राव, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले गेले.

मंजिरी वेव्हाळे वेगवान धावपटू
महिलांच्या १०० मीटर शर्यतीत प्रशिक्षण संचालनालयाच्या मंजिरी वेव्हाळेने १२.०८ सेकंदांत सुवर्ण जिंकत वेगवान धावपटूचा मान मिळवला. मुंबईच्या स्वाती भिल्लारेने १३.०१ सेकंदांत रौप्यपदक, तर मुंबईच्याच माधुरी थिरमेने १३.०५ सेकंदांत कांस्यपदक पटकावले. पुरुष गटात ठाणे शहरच्या वैभव एडगेने १०.०७ सेकंदांत रौप्यपदक आणि मुंबई शहरच्या अमोल लोखंडेने १०.०९ सेकंदांत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. यजमान औरंगाबादचा अखिल पटेल अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमबाजी स्पर्धेत सांगलीचे पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे सर्वोत्कृष्ट नेमबाज ठरले.

औरंगाबाद परिक्षेत्र पुन्हा तळाशी
गेल्या अनेक वर्षांपासून राज्य पोलिस स्पर्धेत औरंगाबाद परिक्षेत्र पदकतालिकेत तळाला राहत आहे. यंदा यजमानपद औरंगाबादकडे असल्याने औरंगाबाद-नांदेड संघ एकत्र करून पदके वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र औरंगाबादचा पुन्हा फ्लॉप शो ठरला. सांघिक गटात संघाला एकही पदक मिळाले नाही. दोन परिक्षेत्र एकत्र केल्याने अनेक खेळाडूंचे नुकसान झाले, त्यांना स्पर्धेत सहभागी होता आले नाही. औरंगाबादने वैयक्तिक गटात ३ सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्यपदके पटकावली. रेणुका देवणे, अखिल रुस्तम पटेल आणि नीलेश जाधवने सुवर्ण जिंकले. थाळीफेकमध्ये रेणुका देवणेने रौप्यपदक मिळवले. कुस्तीमध्ये कावेरी सुरासे व रूपाली राणे, २०० मीटर शर्यतीमध्ये ललिता साळवे आणि वेटलिफ्टिंमध्ये सरिता साखरेने कांस्यपदके मिळवली.