राज्य, केंद्र शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यत पोहोचवा

0

जळगाव । राराज्य तसेच केंद्र शासनातर्फे जनतेच्या विकासाकरीता विविध योजना राबविण्यात येत असतात. ग्रामीण भागाच्या विकासकरीता अनेक योजना शासन राबवित आहे. मात्र अजुनही शासनाच्या योजनेबाबत तळागाळातील जनता अनभिज्ञ आहे. शासनाच्या योजना ह्या जनतेसाठी असतात त्यामुळे त्यांची योग्य अंमलबजावणी होवून योजना जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी सरपंचानी प्रयत्न केले पाहिजे. असे प्रतिपादन प्राचार्य अतुल महाजन यांनी केले. ते जळगाव तालुक्यातील सरपंचांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते. शनिवारी 6 रोजी जळगाव पंचायत समिती येथे सरपंचांसाठी मेळावा घेण्यात आला. उपसभापती शितल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा घेण्यात आला. तालुक्यातील 70 पैकी 55 सरपंच मेळाव्याला उपस्थित होते. उपस्थित सरपंचाना यावेळी गावाच्या विकासाकरीता करावयाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कर वाढीसाठी प्रयत्न
गावाच्या विकासासाठी शासनातर्फे निधी पुरविला जातो. ग्रामपंचायतच्या कर वसुलीवर ग्रामपंचायतीला निधी देण्यात येतो. ग्रामपंचायतीला घरपट्टी, पाणी पट्टी, यात्रा कर आदीच्या माध्यमातून कर मिळत असतो. सरपंच हा गावातीलच नागरिक असल्याने त्यांनी नागरिकांशी योग्य समन्वय साधुन करवसुली तसेच करवाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच विकासासाठी नियोजन करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सरंपचांचे कार्य, अधिकार, कर्तव्यांबाबत माहिती मिळावी यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
सरपंच समितीचा पदसिध्द अध्यक्ष हा पंचायत समितीचा उपसभापती असतो. जळगाव पंचायत समितीच्या उपसभापती शितल कमलाकर पाटील ह्या सरपंच मेळाव्याचे अध्यक्ष होत्या. यावेळी पंचायत समिती सभापती यमुनाबाई रोटे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गटविकास अधिकारी शकुतला सोनवणे, ग्रामसेवक संघटना तालुकाध्यक्ष पवन वाघ, फुपणीचे सरपंच डॉ.कमलाकर पाटील, विस्तार अधिकारी सी.आर.मोतीरायी यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक व सरपंच
उपस्थित होते.

सरपंच समिती स्थापन
कलम 77 (अ) नुसार प्रत्येक पंचायत समितीत सरपंच समितीची स्थापन केली जाते. पंचायत समितीही त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील दुवा आहे. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यात समन्वय साधण्याचे कार्य पंचायत समितीचे असते. सरपंच हा गावाचा पहिला नागरिक असल्याने त्यांच्यामार्फत गावाचा विकास साधला जातो. त्यासाठी सरंपच समितीची स्थापना करण्यात येते. जळगाव तालुका पंचायत समिती अंतर्गत असणार्‍या सरपंच समितीची स्थापना शनिवारी 6 रोजी करण्यात आली. यात एक पंचमांस सरपंचांना स्थान दिले जाते. त्यानुसार तालुक्यातील 15 सरपंचाचा या समितीत सहभाग आहे. समितीचा पदसिध्द अध्यक्ष हा पंचायत समिती उपसभापती असतो. सरपंचांनी शासकीय योजना गावातील लोकांना समजून सांगितल्यास सांगळ्यांचा विकास साधता येईल असे त्यांनी पुढे म्हटले.