राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता?: राजभवनावरील राजकीय हालचालींना वेग

0

मुंबई: सध्या जगभरावर कोरोनाचे संकट आहे. भारतातही कोरोनाच्या संख्येने मोठा टप्पा गाठला आहे. त्यातल्या त्यात भारतातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळेच राज्य सरकारवर अपयशाचा ठपका ठेवला जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्याचे आरोप विरोधकांकडून होत असताना आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी देखील पुढे येऊ लागली आहे. त्यातच आता राजकीय नेत्यांची राजभवनावरील भेटी गाठी वाढल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा मोठे राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली. तत्पूर्वी भाजप नेते खासदार नारायण राणे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. दरम्यान काल राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन चर्चा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांची देखील राजभवनावरील भेटीगाठी वाढल्याने नेमकं राज्याच्या राजकारणात काही तरी घडत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याने राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात अशी देखील शक्यता वर्तविली जात आहे.

Copy