राज्यात मुदतपूर्व निवडणुकांची दाट शक्यता असल्याचे शरद पवारांचे भाकीत

0

कोल्हापूर । राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाटी भारतीय जनता पक्षाशी युती न करण्याच्या शिवसेनेच्या निर्णयाने राज्य सरकार अस्थिर बनले आहे. या स्थितीत शिवसेना सत्तेत राहणार नाही आणि ती राहिली तर सत्तेसाठी शिवसेना काहीही करते असा संदेश जाईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत दिले आहेत. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची संभावना ‘मूर्ख माणूस’ अशी करून त्यांचे सार्वजनिक जीवनात योगदान काय, असा सवालही पवार यांनी केला. तसेच नोटाबंदीवरून यांनी मोदी सरकारविरोधात सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

निरूपमांचे योगदान काय?
पद्मविभुषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पवार यांचा येथे शनिवारी सपत्निक सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा तूर्त विचार नाही. हा निर्णय एकत्र बसून घेण्यात येईल. राज्यात मुदतपूर्व निवडणुका झाल्या, तर समविचारी पक्षांसोबत त्या लढवण्यात येतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. भाजप व राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला होता. त्याबाबत पवार संताप व्यक्त करत निरूपम यांच्यावर जोरदार टीका केली. मुर्ख माणूस, अशी निरुपमांची संभावना करत, त्यांचे सामाजिक व राजकीय जीवनातील योगदान काय, असा प्रश्‍नही पवार यांनी केला.

आमची विचारधारा समाजहिताची
काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. स्वातंत्र लढ्यापासून ते देश उभारणीपर्यंत काँग्रेसचे मोठे योगदान आहे. त्यामुळे काँग्रेस नष्ट करण्याची भाषा यशस्वी होणार नाही. काँग्रेसशी आम्हीही भांडलो, संघर्ष केला. पण दोन्ही काँग्रेसची विचारधारा एकच असून, ती सामाजिक हिताची आहे. स्वातंत्र्यलढ्यावेळी काँग्रेसने प्राणांची आहुती दिली.  काँग्रेसवर बोलणारी मंडळी या लढ्यात कोठेच नव्हती. देशाची उभारणी करून जगासमोर यशस्वी प्रतिमा काँग्रेसनेच निर्माण केली, असे पवार म्हणाले.

न्यायालयीन कारवाई करणार
दरम्यान शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा दिला आहे. सरकारने अचानक 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्या. राज्यातील सहकारी बँकांनी 8600 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत. मात्र, अद्याप मोदी सरकारने सहकारी बँकांना नव्या नोटा उपलब्ध करून दिल्या नाहीत. परिणामी आपल्याला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे शरद पवारांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकरण्याची परवानगी दिली, मात्र, नव्या नोटा देण्याची दिली नसल्याचे पवार यांनी सांगितले.

दोन्ही काँग्रेसने एकत्र यावे
केंद्रात सत्तेत येण्यात दोन्ही काँग्रेस कमी पडल्या. पण आता बिघडलेले दुरुस्त करण्याची भूमिका घ्यावी लागेल, असे सांगत पवार यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. याची सुरुवात प्रागतिक विचाराच्या कोल्हापुरातून व्हावी, अशी सूचना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केली. राष्ट्रपतिपदासाठी पवार यांना उमेदवारी दिली जाणार का, अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. माझ्या पक्षाकडे त्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही, असे ते म्हणाले.