राज्यात पंजाबी साहित्य अकादमी स्थापन करणार

0
मुंबई:राज्यात पंजाबी भाषेचा विकास, संवर्धन, प्रगती होण्यासह पंजाबी व मराठी भाषेतील साहित्याचे आदान-प्रदान होऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उर्दू साहित्य अकादमीच्या धर्तीवर ही अकादमी कार्य करेल.
महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यात मध्ययुगीन काळापासून सांस्कृतिक ऋणानुबंध  स्थापित झाले आहेत. संत नामदेव यांच्या रचना गुरू ग्रंथ साहिब या शिख धर्माच्या धर्मग्रंथात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पंजाबी आणि मराठी संस्कृतीच्या एकत्रिक विकासासाठी आणि दोन्ही भाषेतील साहित्याचे आदान-प्रदान वाढीस लागावे  यासाठी पंजाबी साहित्य अकादमीची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार ही आकादमी स्थापन करण्याचा निर्णय झाला असून या माध्यमातून पंजाबी साहित्याचा मराठीत आणि मराठी साहित्याचा पंजाबीत अनुवाद करणे, राज्यात प्रकाशित होणाऱ्या पंजाबी पुस्तकांना पारितोषिके देणे, ग्रंथालयांना पुस्तके-नियतकालिकांचा पुरवठा करणे, परिसंवाद, कार्यशाळा, पंजाबी मेळावा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबरोबरच साहित्य, पत्रकारिता, शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे.
अकादमीच्या अध्यक्षपदी अल्पसंख्याक विभागाचे मंत्री तर उपाध्यक्षपदी विभागाचे राज्यमंत्री असतील. विभागाचे सचिव आणि उपसचिव हे शासकीय सदस्य म्हणून काम पाहतील. याशिवाय 11 अशासकीय सदस्य असणार आहेत. या अकादमीसाठी चार नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 46.80 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली असून नवी पदे भरेपर्यंत सध्या उर्दू अकादमीचे अधीक्षक आणि कार्यकारी अधिकारी अकादमीचे कार्य पाहतील.
Copy