राज्यात ओबीसी मुख्यमंत्री हवा; ओबीसी मोर्च्यात एल्गार

0

जालना: मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच ओबीसी समाजाची जनगणना करावी या मागणीसाठी आज रविवारी जालन्यात ओबीसी समाजातर्फे विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात हजारोच्या संख्येने ओबीसी समाजबांधव सहभागी होते. सर्वपक्षीय नेते या मोर्च्यात होते. कॉंग्रेस नेते मंत्री विजय वडेट्टीवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समीर बुजबळ यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

यावेळी राज्यात ओबीसी मुख्यमंत्री हवा असा एल्गार पुकारण्यात आला आहे. आजपर्यंत राज्यात ओबीसी मुख्यमंत्री झालेले नाही. राज्यात ओबीसींची संख्या मोठी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ओबीसी पाहिजे अशी मागणी होऊ लागली आहे. मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे, जर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला, आमच्या हक्काचे हिरावून घेतले तर शांत बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आग्रीही आहोत, मात्र ओबीसी आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही देशाचे नागरिक आहोत आमचीही जनगणना झाली पाहिजे असे भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Copy