Private Advt

राज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेची मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी : गिरीश नेमाडे यांची माहिती

भुसावळ : शिक्षकांच्या प्रत्येक महिन्याच्या वेतन विलंबाचा प्रश्न सोडवून केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात झालेली 11 टक्के वाढ राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना विनाविलंब देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परीषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह विश्वनाथ दराडे, संघटनमंत्री सुहास हिर्लेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक परिषदेचे जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा जिल्हा प्रभारी गिरीश एस.नेमाडे यांनी दिली.

चार महिन्यांचे वेतन अनुदान एकदाच मंजूर करावे
सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार केंद्र सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना 1 जानेवारी 2020 पासून चार टक्के, एक जुलै 2020 पासून तीन टक्के आणि 1 जानेवारीपासून 4 टक्के असा एकूण 11 टक्के महागाई भत्ता दिला जाणार आहे. केंद्राप्रमाणे महागाई भत्ता वाढ राज्यातही देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे मात्र हा निर्णय उशिरा होत असल्याने थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढले. जुलै ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत पाच टक्के दराने पाच महिन्यांची थकबाकी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना मिळालेली नाही. त्यामुळे पाच टक्के थकबाकी तसेच केंद्र सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे 11 टक्के वाढीव महागाई भत्ता विनाविलंब देण्याचा शासन निर्णय घ्यावा तसेच प्रत्येक महिन्याला शिक्षक-शिक्षकेतर यांचे वेतन उशिरा होते. प्रत्येक महिन्याला वेतन अनुदान मंजूर होत असल्याने प्रशासकीय कार्यवाहीला वेळ जातो त्यामुळे किमान चार महिन्यांचे वेतन अनुदान एकदाच मंजूर करावे आणि शिक्षकांची वेतन विलंबाची समस्या सोडवण्यासाठी निर्देश देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

मागण्यांच्या पूर्ततेसाठी पदाधिकार्‍यांचा पाठपुरावा
या मागणीसाठी शिक्षक परीषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्य कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे, संजीवनीताई रायकर, महिला आघाडीप्रमुख पूजा चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, सुनील पंडित, दिलीप अहिरे, बाबासाहेब बोडखे, बाबासाहेब काळे आदी प्रयत्नशील असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक परिषदेचे जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा जिल्हा प्रभारी गिरीश एस.नेमाडे यांनी दिली.