Private Advt

राज्यभरात पोलीस असल्याचे सांगत नागरीकांना गंडा : इराणी टोळी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

राज्यभरातील 12 गुन्ह्यांचा उलगडा : धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

धुळे/भुसावळ : पोलीस असल्याचे सांगून नागरीकांना गंडवणार्‍या टोळीचा धुळ्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चाळीसगाव रोड परीसरातून सोमवारी मुसक्या आवळल्या आहेत. राज्यभरात गुन्हे करणार्‍या इराणी टोळीतील तब्बल पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून स्कार्पिओसह दोन दुचाकी मिळून सात लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. दरम्यान, आरोपींनी धुळे जिल्ह्यात पाच गुन्हे केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पााटील यांनी मंगळवारी पत्रकार परीषदेत दिली.

या आरोपींना अटक व मुद्देमालही जप्त
अकबर शेरखान पठाण , राज मोहम्मद मुन्वर अली, अयुब उर्फ भुर्‍या फयाज शेख उर्फ इराणी (इराणी मोहल्ला, श्रीरामपूर), असदुल्ला फयाज खान (कल्याण), शेख इम्रान अब्दुल सलाम (मालेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून सव्वा लाखांचे दागिने, 20 हजार रुपये किंमतीचे सात मोबाईल, पाच लाखांची स्कॉर्पिओ (एच.आर.80 डी.3982), पल्सर (एम.एच.15 एच.बी.8683) व युनिकॉन (एम.एच.41 डब्ल्यू.174), हेल्मेट, नऊ पी कॅप टोप्या, 14 हातरूमाल, 12 मास्क असा एकूण सात लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

धुळे जिल्ह्यातील पाच गुन्ह्यांची कबुली
आरोपींनी राज्यभरात एकूण सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे तर यात धुळे जिल्ह्यातील पाच गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यात धुळे तालुका, देवपूर, चाळीसगाव रोड, निजामपूर, दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, या व्यतिरीक्त आरोपींनी नाशिकसह नंदुरबार तालुक्यातील सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपी अकबर पठाणविरोधात तब्बल 25 तर असदुल्ला खान व अयुब इराणी विरोधात 16 गुन्हे दाखल आहेत.

यांनी उघडकीस आणले गुन्हे
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा.निरीक्षक प्रकाश पाटील, योगेश रात, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, प्रकाश सोनार, संदीप सरग, योगेश चव्हाण, चेतन कंखरे, सुनील पाटील, मयूर पाटील, तुषार पारधी, श्रीशैल जाधव, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, महेंद्र सपकाळ, मनोज महाजन आदींच्या पथकाने केली.