राज्यपालांकडून जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त

0

श्रीनगर-जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त केली आहे. राज्यपालांचा हा निर्णय पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपालाकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता. सत्ता स्थापनेच्या अफवेमुळे जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त केली असे मत गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले आहे.

पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपालांना चिठ्ठी लिहून जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याकडे पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा केलेला असतानाच राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या बळावर सरकार स्थापन करण्याच्या मेहबूबा मुफ्ती यांच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाने काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या साथीने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये पीडीपीचे २८, नॅशनल कॉन्फरन्सचे १५ आणि काँग्रेसचे १२ आमदार आहेत. पीडीपी-नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस मिळून ५५ आकडा होतो. जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेसाठी ४४ आमदारांची गरज असते.

पीडीपीचे आमदार इमरान अन्सारी यांनी बंडाचा झेंडा उगारला असून आपल्याकडे १८ आमदार असल्याचं सांगत त्यांनीही सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे दावा सादर करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यापूर्वीच राज्यापालांनी विधानसभा बरखास्त करून मेहबूबा मुफ्ती आणि सज्जाद लोन यांना मोठा झटका दिला आहे.

Copy