राजोरा-अट्रावल रस्त्याचे वाजले बारा

0

यावल । तालुक्यातील अट्रावल ते राजोरा या 5 किमी अंतराच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने रस्त्यात खड्डे की, खड्यात रस्ते अशी शंका उपस्थित होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम कधी होणार, याचे सुज्ञ नागरिक अपेक्षा बाळगून आहे. भुसावळ मार्गावर असलेल्या राजोरा फाटा ते अट्रावल या 10 किमी अंतराच्या रस्त्याचे काम बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित होते, गेल्या 8 ते 15 दिवसापूर्वी या ठिकाणी फक्त राजोरा फाट्यापासून ते राजोरा या गावापर्यंतच रस्ता बनविण्यात आला आहे. पुढे राजोरा ते अट्रावल या रस्त्यावरचे ‘जेसे थे वेसे’ चित्र पहावयास मिळत आहे.

बससेवा झाली बंद
माघ महिना असल्याने अट्रावल येथे मुंजोबाची यात्रा भरते. याठिकाणी राज्य-परराज्यातील भाविक भुसावळ येथून अट्रावलला जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात तसेच लाखोच्या संख्येने येणारे भाविक व हजारोच्या संख्येने वाहने या रस्त्यावर चालतात. रस्त्याच्या दयनिय स्थितीमुळे बसेस व इतरत्र खाजगी वाहने चालविणे कठीण होते. त्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो. यावल आगारातून यावल-भुसावळ ही बससेवा राबविली जात होती. परंतु रस्त्याची स्थिती अत्यंत दयनिय असल्यामुळे याठिकाणाहून बस सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे या रस्त्यालगत असलेल्या चितोडा, अट्रावल, सांगवी खु॥ व राजोरा या गावातील नागरिकांचा या बससेवेपासून वंचित रहावे लागत आहे.

शेतमालाची वाहतूक ठरते अडचणीची
तसेच विद्यार्थ्यांना बस उपलब्ध नसल्यामुळे रोज 2 किमी अंतरावर यावल-भुसावळ या मार्गावर पायपीट करावी लागत असते. त्याचप्रमाणे या रस्त्यालगत शेत मालाची वाहतुक करताना ट्रॅक्टर, बैलगाडी व इतरत्र वाहनांनी आणणे म्हणजे मोठ्या बिकट परिस्थितीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. पावसाळ्यात या रस्त्याची स्थिती तर अत्यंत दयनिय असते. मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने अपघातांना निमंत्रण देत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे व यावल-भुसावळ ही बस सेवा पुन्हा सुरु करण्यात यावी. जेणे करुन विद्यार्थ्यांना या बस सेवेचा लाभ मिळावा, अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.