राजू शेट्टी आणि मेटेंची जाहीर टीका

0

मुंबई : महायुतीतील घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष‘ विनायक मेटे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. शिवस्मारकासाठी जल-मातीच्या कलशाच्या शोभायात्रेतून अर्ध्या रस्त्यावरुन निघून जात ही शोभायात्रा म्हणजे भाजपचे शक्तिप्रदर्शन आहे, अशी टीका मेटे यांनी केली आहे. शिवस्मारकाचे भूमिपूजन केवळ भाजपचा अजेंडा राबवण्यासाठी आहे, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना-भाजपतील मतभेदांबाबत माहिती नाही. हा सगळा श्रेयाचा भाग आहे. पण महापालिका निवडणुका समोर आल्यामुळे हे होणारच असले तरी पण भाजपने शिवसेना आणि घटकपक्षांना सोबत घ्यायला हवे होते, अशी प्रतिक्रियाही मेटे यांनी व्यक्त केली. तर घटक पक्षाची नाराजीही आता स्पष्ट दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षप्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा कार्यक्रम म्हणजे भाजपने आपली खासगी मालमत्ता बनवली असून हे बरोबर नसल्याची प्रतिक्रीया शेट्टी यांनी दिली आहे.

मित्रपक्षाला डावलल्याचेच चित्र!
शनिवारी मुंबई येथे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन होणार आहे. या कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही, यावरून आधीच वाद झाले. सन्मानपूर्वक आमंत्रण मिळाल्यावर अखेर त्यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले. मात्र या स्मारकाचे श्रेय एकटय़ा भाजपला मिळावे, अशी व्यूहरचना केली गेली आहे. त्याचे प्रत्यंतर स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांमध्ये येऊ लागले . नाशिक येथे गुरुवारी झालेल्या गोदावरी नदीच्या जल संकलन कार्यक्रमापासूनही भाजपने मित्रपक्ष शिवसेनेला चार हात दूर ठेवल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या एकाही स्थानिक पदाधिकाऱ्याला कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपने दिले नव्हते, असे सांगण्यात आले. तर खुद्द शिवस्मारक समितीच्या अध्यक्ष विनायक मेटे यांना या कार्यक्रमाच्या वेळी स्टेजवर स्थान मिळणार की नाही हेच अद्यापही निश्चीत नाही.

मच्छीमारांचा विरोध कायम
मच्छीमार व्यवसाय संकटात येण्याच्या भितीने मुंबईतील मच्छीमार संघटनांनी प्रस्तावित शिवस्मारकाला केलेला विरोध मुख्यमंत्र्यांनी झालेल्या चर्चेनंतर मावळला नसून तो कायम आहे. मच्छीमारांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या संघटनांना दिल्यानंतर हा विरोध मागे घेण्यात आला नसल्याने आता उद्याच्या कार्यक्रमावर या विरोधाचे सावट आहे.