राजगृहावरील हल्ल्याचा भुसावळ विभागात निषेध

0

भुसावळ : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहावर’ अज्ञातांनी मंगळवारी तोडफोड करीत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नुकसान केल्याने या घटनेचा भुसावळ विभागात निषेध नोंदवण्यात आला. दोषी हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. हा हल्ला म्हणजे डॉ.आंबेडकर यांच्या अनुयायांच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याचे आंबेडकरवादी संघटनांनी निवेदनात नमूद केले आहे.

बोदवडमध्ये भाजपातर्फे तहसीलदारांना निवेदन
बोदवड : तहसील कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या संदर्भात तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी भाजपाचे बोदवड तालुकाध्यक्ष विनोद कोळी, सचिन राजपूत, प्रदीप बडगुजर, सुधीर पाटील, पंचायत समितीचे सभापती किशोर गायकवाड, रवी खेवलकर, किरण वंजारी, राम आहुजा, सलामोद्दीन सिरीजुद्दीन, भगतसिंग पाटील आदी उपस्थित होते.

दोषींवर कारवाई करा : दलित पँथरची मागणी
भुसावळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहर पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना दलित पँथरतर्फे करण्यात आली. या घटनेमागील सूत्रधाराचा शोध घेवून येथे कायमस्वरुपी पोलिस बंदोबस्त लावावा, अशी मागणीही करण्यात आली. निवेदन देताना दलित पँथरचे जिल्हा प्रमुख सुदाम सोनवणे. महाराष्ट्र सरचिटणीस सिध्दार्थ सोनवणे, अल्केश मोरे, संजय घामोडे, शांताराम नरवाडे, राजु तायडे, विजय साळवे, आनंद वाघ, राम अवतार, बाबुलाल हरणे उपस्थित होते.

षडयंत्र रचणार्‍यावरही कारवाई करा : काँग्रेस
भुसावळ : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी काही अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तोडफोड तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली असून घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून पुस्तकांसाठी हे घर बांधण्यात आले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. या घरावर झालेला म्हणजे संपूर्ण जग भरातील आंबेडकर अनुयायांवर हल्ला असून त्यांच्या अस्मितेवरही हा घात करण्याचा प्रकार असल्याचे जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना ट्विटरद्वारे त्यांनी निवेदन दिले आहे. या हल्ल्याची सखोल चौकशी करुन या मागील नेमके षडयंत्र कोणाचे आहे ? याचा तातडीने शोध घेऊन आरोपींना कडक शासन व्हावे अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नरवाडे यांनी दिला आहे.

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा : मुन्ना सोनवणे
भुसावळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष मुन्नाभाई सोनवणे यांनी निषेध केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करून या हल्ल्याची सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. राहगृह हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असून राजगृहावर हल्ला म्हणजे आंबेडकरी जनतेच्या अस्मितेवर हल्ला असून या हल्ल्याने जगभरातील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे.

Copy