रस्त्यावर भटकणार्‍यांना ‘अँन्टीजन’ पर्याय

भुसावळ पालिका व पोलिसांच्या कारवाईने खळबळ : पहिल्याच 80 जणांची टेस्ट

भुसावळ : राज्यात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर 15 दिवस संचारबंदी जाहीर झाल्यानंतरही जिल्ह्यात मात्र रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांच्या प्रमाणात वाढ सुरू असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने अशांविरुद्ध कारवाईच्या सूचना प्रशासनाने केल्या होत्या. बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ या मोहिमेत 50 जणांची चाचणी करण्यात आली होती मात्र त्यावेळी सुदैवाने कुणीही बाधीत आढळला नव्हता तर शुक्रवारी विनाकारण रस्त्यावर येणार्‍यांची संख्या वाढताच पोलिस व पालिका प्रशासनाने धडक मोहिम राबवत 80 जणांची तपासणी केल्यानंतर त्यात एक जण बाधीत आढळल्याने त्यास तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले. अहवाह पॉझीटीव्ह येताच विनाकारण बाहेर पडणार्‍यांची भंबेरी उडाली. दरम्यान, शहर व बाजारपेठ हद्दीत अचानक अ‍ॅन्टीजन टेस्ट केली जाणार असून आता ग्रामीणमध्ये पथकाद्वारे ही चाचणी केली जाईल, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाघ वाघचौरे यांनी ‘जनक्ती’शी बोलताना दिली.

एकाच दिवशी 1500 नागरीकांची तपासणी
शहरात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता शुक्रवारी एक हजार 445 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरातील पालिका दवाखाना, खडकारोड आरोग्य केद्र, वरणगाव रोडवरील आरोग्य केंद्र, बद्री प्लॅटमधील आरोग्य केद्र, ट्रामा केअर सेंटर, महात्मा फुले आरोग्य केद्र येथे स्वॅब तपासणी केली जात आहे. स्वॅब तपासणीमुळे शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत असलीतरी त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले आहे.

रीक्षा चालकांचीही होणार तपासणी
पोलिस उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले की, सातत्याने प्रवाशांच्या संपर्कात आलेल्या शहरातील रीक्षा चालकांचीदेखील आता तपासणी केली जाणार आहे शिवाय आरोग्य विभागाशी त्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. शहरात संचारबंदी सुरू असलीतरी नागरीक विनाकारण रस्त्यावर येवून कोरोनाचा संसर्ग वाढवत असल्याने अशांविरुद्ध आता थेट रस्त्यावर प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टीजन केली जात आहे. शुक्रवारी गांधी पुतळ्याजवळ 50 नागरीकांच्या चाचणीत एक बाधीत आढळल्याने त्यांना तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचीही चाचणी आता होईल. ग्रामीण भागातही कोरोना वाढल्याने या भागातही अचानक मोहिम राबवून अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

आरटीपीसीआर अहवाल मिळत नसल्याने संताप
कोरोना आरटीपीसीआर स्वॅब दिल्यानंतर आठ दिवस उलटूनही अहवाल मिळत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अहवालासाठी भटकंती करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. स्वॅबअभावी रुग्ण बाहेर पडत असल्याने कोरोना फैलाव वाढण्याची भीती आहे. शहरात 6 एप्रिल नंतरचे अहवाल अद्यापही प्रलंबीत आहे. तसेच यंत्रणेकडे स्वॅब दिलेल्यांना फोनव्दारे रीपोर्ट निगेटिव्ह किंवा पॉझीटीव्ह असल्याबाबतची माहिती रुग्णांना कळविण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. जिल्हाधिकार्‍यांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.