रस्त्यावरील खासगी वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी जलदगती बसचे जाळे

0

किरण गित्ते यांची माहिती : पीएमआरडीएने तयार केला पुढील 20 वर्षांचा सर्वकष वाहतूक आराखडा

पुणे : शहरालगत वेगाने वाढणार्‍या उपनगरांचा पुढील 20 वर्षांचा सर्वकष वाहतूक आराखडा (सीएमपी) पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केला आहे. रस्त्यावरील खासगी वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी पीएमआरडीएने या आराखड्यात जलदगती बससेवेला प्राधान्य दिले आहे. मेट्रोच्या 125 किलोमीटर लांबीच्या आठ मार्गिकांबरोबरच 70 किलोमीटर लांबीची लाईट मेट्रो रेल्वे आणि तब्बल 210 किलोमीटर लांबीचे बीआरटीचे (बस रॅपिड ट्रॉन्झिट-बीआरटी) जाळे आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे. शहरालगतच्या 10 तालुक्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत मेट्रो, रिंगरोड, बीआरटी मार्ग, बस टर्मिनल वर्तुळाकार रेल्वे आदी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. या सर्वांसाठी 54 हजार 601 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळाला सर्व बाजूने वाहतूक मार्ग जोडण्यासाठी 100 किलोमीटर वर्तुळाकार रेल्वे ट्रॅक (लोकल सेवा) उभारण्यात येणार आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.

अन्यथा आराखडा राहील कागदावर

सन 2038 पर्यंत म्हणजे 20 वर्षांचा विचार करून चार टप्प्यांत कामाचे नियोजन करण्यात येत आहे. जानेवारी ते जून 2018 या सहा महिन्यांच्या कालावधीत एलअ‍ॅण्डटी कंपनीने प्रत्यक्ष पाहणी करून हा सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. यासाठी या कंपनीला 3 कोटी रूपये देण्यात येणार आहे. त्यातील 20 टक्के रक्कम (60 लाख रूपये) अदा करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे प्रस्तावित बीआरटी आणि मेट्रो मार्ग लक्षात घेता पीएमआरडीएला या दोन्ही यंत्रणांशी समन्वय ठेवावा लागणार असून समन्वय राहिला नाही तर पीएमआरडीएचा हा र्सवकष आराखडा कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

आराखडा सुधारीत करण्याची तरतूद

औंध येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आयुक्त किरण गित्ते, नगर नियोजनकार विवेक खरवडकर यांनी त्याचे सादरीकरण केले. पुणे महानगरपालिका हद्द, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे, तर उर्वरित पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, पुणे शहर, हवेली, खेड, शिरूर, दौंड, पुरंदर, भोर व वेल्हा आदी दहा तालुक्यांचा समावेश यात आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत आराखड्याला मान्यता मिळाली. तसेच दर पाच वर्षांनंतर हा आराखडा सुधारीत करण्याची तरतूद करण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्याचे प्रयत्न

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, रेल्वे विभाग, पुणे आणि ग्रामीण पोलीस, वाहतूक विभाग, तीन कॅन्टोमेंन्ट विभागाचे आधिकारी तसेच नगरपालिकांच्या मदतीने पीएमआरडीएच्या सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आणि उपनगरांमध्ये पायाभूत सुविधा यातून मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. विवेक खरवडकर, नगर नियोजनकार, पीएमआरडीए

Copy