रस्त्यात लागणारी वाहने ठरताहेत डोकेदुखी

0

वरणगाव : जुन्या गावातील मुख्य रस्ते व गल्ली बोळात रात्रीच्यावेळी वाहनधारक रस्त्यात वाहने उभी करुन रहदारीस अडथळा निर्माण करीत आहे. तसेच अल्पवयीन मुले वस्तीचा विचार न करता दुचाकी वाहने सुसाट वेगात चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात टाकण्याचे प्रकार सुरू असून वाहतूक शाखेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

प्रवाशांना करावी लागतेय कसरत
जुन्या गावातील रस्ते व गल्ली बोळातील रस्ते आधीच अरुंद असल्याने व नुकतेच पालिकेच्या माध्यमातून काँक्रीटीकरणाचे कामे झाले आहेत. मात्र या रस्त्यावर रात्रीच्या वेळी रिक्षा, मोटरसायकल, अ‍ॅपेरिक्षा, ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहने वाहनधारक दिवसा व्यवसाय आटोपून रात्रीच्या वेळेस घरासमोरील रस्त्यावर वाहन लावत असल्याने ये-जा करणार्‍या इतर वाहनांना व आपतकालीन व रुग्ण असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या वाहनांना अडथळा निर्माण करीत आहे. तसेच रात्री-बेरात्री एखाद्या व्यक्तीकडे बाहेरगावाहून कोणी प्रवासी आल्यास त्यांना घरापर्यंत येण्यास त्यांना या रस्त्यात उभी केलेल्या वाहनामुळे तारेवरची कसरत करावी लागते किंवा एखाद्या वेळेस रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनधारकास झोपेतून उठवावे लागते.

गाडी हटविण्यावरुन होतात वाद
काही वेळेस प्रवासी वाहनधारक व या वाहनधारकांमध्ये गाडी काढण्यावरुन वादही होतात. असे प्रकार शहरात दैनंदिन सुरू आहे. यावर कोणीही बोलण्यास तयार नसल्याने ही मालिका सुरूच आहे. तसेच शहरात दिवसा व रात्री अल्पवयीन मुले आपल्या ताब्यातील मोटरसायकल वाहने रस्त्याकडे दुर्लक्ष करून कॉलन्या गल्लीबोळातील व मुख्य रस्त्यावर मानवी वस्त्यामधून सुसाट वेगाने चालून दुसर्‍याच्या व स्वतःच्या जीवास धोका निर्माण करीत आहे. याकडे पालकवर्गाने व पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे तर गावातील बाजार गल्लीमध्ये फुल विक्रेते व अन्य व्यापारी आपल्या दुकानासमोर भर रस्त्याच्या कडेला डेबल टाकून चारपाई टाकून आपले दुकान थाटत असतात. त्यामुळे रहदारीस नेहमी अडथळा निर्माण होत असतो. याकडे पालीका प्रशासनाने आजपर्यंत का लक्ष दिले नाही, याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आतातरी याकडे पालीका लक्ष देईल काय? असा यक्ष प्रश्न नागरिकांना पडला आहे.