रस्ते अपघात कमी करण्याची जबाबदारी खासदारांवर येणार

0

केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा समिती स्थापनेसाठी पुढाकार

नवी दिल्ली: देशात रस्ते अपघातामुळे मृत्युमुखी पडणार्‍यामध्ये 70 टक्के प्रमाण हे 18 ते 45 या वयोगटातील आहे. ही बाब चिंताजनक आहे. रस्ते सुरक्षेसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या समितीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी सक्रीय सहभाग नोंदवून आपल्या शहरातील अपघातप्रवण स्थळांची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी आणि ती दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी नागपूरमध्ये बोलताना केले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर आणि प्रादेशिक परिवहन विभाग, नागपूर तसेच संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, रस्ते अभियांत्रिकीमध्ये सुधारणा, रस्ते नियमांबद्दल शिक्षण, कायद्याची कठोर अंमलबजावणी, तसेच अपघातवेळी दाखवण्याची तत्परता या चतु: सूत्रीवर भर देत रस्ते सुरक्षा या क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याची आवश्यकता आहे.

जनआक्रोश सारख्या स्वयंसेवी संस्था शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा संदर्भात देत असलेल्या शिक्षणाचे उपक्रमाचेही त्यांनी विशेष कौतुक केले. राजू जाधव या सामाजिक कार्यकर्त्याने आतापर्यंत त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 8 हजार जखमी लोकांना मदत केली आणि 500 लोकांचे प्राण वाचवले याचा देखील विशेष उल्लेख गडकरी यांनी केला आणि राजू जाधव यांच्या सारखेच जीवनरक्षक समाजकार्य इतर लोकांनी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. विकास महात्मे यांनी अपघात झाल्याच्या पहिल्या तासामध्ये जीव वाचण्याची शक्यता वाढते, असे सांगून या गोल्डन हवरमध्ये रस्त्यालगत असलेले दुकाने, ठेले यांना प्रथमोपचाराच्या किट्स वाटप करून त्यांना अशा अपघातासमयी काय काळजी घेणे आवश्यक आहे या संदर्भातले प्रशिक्षण सुद्धा काही स्वयंसेवी मार्फ संस्थेमार्फत देण्यात येत असल्याचा उल्लेख केला. आम्ही करून दाखवले: नागपूरच्या संसद सदस्य रस्ता सुरक्षा समितीने घेतलेल्या बैठकांमुळे आणि तब्बल 20 ब्लॅक स्पॉटमध्ये केलेल्या सुधारणांमुळे नागपूर ग्रामीणमध्ये अपघाताचे प्रमाण हे 8 टक्क्यांनी तर मृत्यूचे प्रमाण हे 1 टक्क्याने कमी झाले आहे तर शहरी शहरी भागांमध्ये अपघातांचे प्रमाण 23 टक्क्यांनी कमी झाले असून 16 टक्के मृत्यू मध्ये घट झाली असल्याचे गडकरी यांनी सांगितले. रस्ते अपघातांचे कारण हे रस्ते अभियांत्रिकी असल्याने यासाठी जवळपास 12.5 हजार कोटी रुपये खर्च करून ब्लॅक स्पॉट दुरुस्त करत असल्याची माहिती गडकरींनी दिली.

Copy