रशियातील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरणारा ब्राझील पहिला संघ

0

माँटेव्हिडिओ (पॅराग्वे) । ब्राझील रशियातील विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. पॅराग्वेचा पराभव करून पात्रता स्पर्धेत सलग आठवा विजय मिळवून ब्राझीलने दणदणीत प्रवेश केला. ब्राझीलने 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. तर मेस्सीविना खेळणार्‍या अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे त्यांचा थेट पात्रतेचा मार्ग अधिक कठीण झाला.

ब्राझीलचा धडाका जबरदस्त
पात्रता स्पर्धेचा अंतिम टप्पा सुरू असताना ब्राझीलचा धडाका जबरदस्त राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी सहा सामन्यांत त्यांना केवळ नऊच गुण मिळवता आले होते. कोपा अमेरिका स्पर्धेतही पहिल्याच फेरीत गारद व्हावे लागले होते. प्रशिक्षक डुंगा यांची हकालपट्टी केल्यानंतर नवे प्रशिक्षक टेट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जोरादर मुसंडी मारली. पॅराग्वेविरुद्धच्या या सामन्यात ब्राझीलचे सुरवातीपासून वर्चस्व होते. कुटिन्होने 34 व्या मिनिटाला गोल केला. सामन्याच्या 53 व्या मिनिटाला पेनल्टी किकवर गोल करण्याची संधी नेमारने दवडली. या अपयशाची भरपाई नेमारने 64 व्या मिनिटाला केली. मध्य रेषेच्या पलीकडून त्याने चेंडूवर ताबा मिळवत डाव्या बगलेतून शानदार गोल केला. त्यानंतर मार्सेलोने ब्राझीलचा तिसरा गोल केला.

मेसीला चार सामन्यांच्या बंदी
एकीकडे ब्राझील आपली पात्रता निश्‍चित करत असताना गत उपविजेत्या अर्जेंटिनाची मात्र पीछेहाट झाली आणि यास कारणीभूत ठरली ती सुपरस्टार लिओनेल मेस्सीची अनुपस्थिती. चिलीविरुद्धच्या सामन्यात लाईन्समन्सला शिवीगाळ केल्यामुळे चार सामन्यांच्या बंदीची शिक्षा मेस्सीला करण्यात आली आहे, त्यामुळे बोलिव्हियाविरुद्धच्या सामन्यात त्यांना 0-2 अशा पराभवास सामोरे जावे लागले. गेल्या आठवड्यात चिलीवर विजय मिळवून अर्जेंटिनाने गटात तिसरे स्थान मिळवले होते. त्या वेळी त्यांचे पाच सामने शिल्लक होते, आता चार सामन्यांची मेस्सीवरील बंदी त्यांच्या अडचणीत वाढ करणारी आहे. मेस्सीच्या अनुपस्थितीमुळे अर्जेंटिनाचे प्रशिक्षक एडगार्डो यांना आघाडी फळीत बदल करावा लागला. परिणामी सर्गी अग्युएरोला राखीव खेळाडूंत ठेवले आणि त्याचाही फटका त्यांना बसला.