रमजीपूर्‍यात डायरीयाने घेतला दोघांचा बळी : 13 जण अत्यवस्थ

0

82 जणांना लागण : ग्रामपंचायतीसह आरोग्य प्रशासन खळबडून जागे

रावेर : तालुक्यातील रमजीपूर येथे गत आठवड्याभरापासून डायरीयाची लागण झाली असून दूषित पाण्यामुळे दोघांचा मृत्यू ओढवल्याने गावासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, डायरीयामुळे 13 जणांची प्रकृती अत्यवस्थ झाली असून एकूण 86 जणांना लागण झाल्याने आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासन खळबडून जागे झाले आहे. 13 गंभीर रुग्णावर गावातील अंगणवाडीच्या इमारतीत तात्पुरता उभारलेल्या उपचार केंद्रात औषधोपचार सुरू असून रुग्णांच्या संख्येत मात्र वाढ होत असल्याने साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ग्रामपंचायत कारभाराभविषयी तीव्र संताप
अज्ञात व्यक्तीकडून गावाला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन फोडण्यात आल्याने गत आठवडेभरापासून गावाला दूषित पाणीपुरवठा होत असल्याने डायरीयाची लागण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दूषित पाण्याच्या सेवनाने शौचालयासह उलटी होण्याचे प्रमाण आठवडाभरापासून सुरू होते मात्र दररोज दोन-चार रुग्ण असल्याने याची फारशी चर्चा झाली नाही. दोघे मयतांच्या आप्तेष्टांनी दिलेल्या माहितीनुसार शौचासह उलटीच्या त्रासामुळे गुरुवार 5 डिसेंबर रोजी मनीषा राजू वानखेडे (26) या महिलेचा तर रविवार, 8 डिसेंबर रोजी काशिनाथ सोना तायडे (55) यांचा दोघांचा मृत्यू ओढवला.

डायरीयाने बाधीत आरोग्य कॅम्पमध्ये
डायरीयाचा अधिक त्रास होत असलेल्यांमध्ये पराग महाजन, दीपक महाजन, हजराबाई तडवी, वंदना महाजन, साक्षी कवडकर, कांचन महाजन, रुपाली महाजन, गोविंदा कवडकर, समशेर तडवी, मंगलाबाई महाजन, अय्युब तडवी, अकिल तडवी या 13 जणांना या उपचार केंद्रात दाखल करून घेण्यात आले आहे. त्यांच्यावर ऐनपूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.डी. महाजन, डॉ.संजय चौरे यांच्यासह आठ जणांचे वैद्यकीय पथक उपचार करीत आहेत. दरम्यान, तीन महिन्यांच्या बाळावर रावेर ग्रामीण रुग्णालयात तर अनेक रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपासून ऐनपूर येथील प्राथमिक आरोग्य विभागा तर्फे प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले असून ग्रामस्थांना प्रतिबंधात्मक उपचार म्हणून औषधी वितरण करण्यात आली.

तहसीलदारांची भेट
डायरीयाची साथ लागल्याची माहिती मिळताच रमजीपूरला जिल्हा परीषदेचे आरोग्य विभागाचे साथरोग विस्तार अधिकारी अजय चौधरी यांच्यासह तहसीलदार उषाराणी देवगुणे, पंचायत समितीच्या सभापती माधुरी नेमाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोपाळ नेमाडे, सहाय्यक गट विकास अधिकारी हबीब तडवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी अंगणवाडीतील उपचार सुरू असलेल्या रुग्णांना भेट देऊन पाहणी केली.

पुढील दोन दिवसात स्थिती सुधारेल
गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे डायरीयाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू असून गावात आरोग्य कॅम्प लावण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात स्थिती चांगली होईल, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक महाजन यांनी सांगितले.

Copy