Private Advt

रणजितसिंग राजपूत यांना ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ जाहीर

खान्देशचा अभिमान - पुरस्काराचा खान्देशाला प्रथमच मान

भुसावळ : शहरातील रणजीतसिंग राजपूत ह्यांना देशातील युवा श्रेत्रात सर्वोत्कृष्ट पुरस्कार मानल्या जाणार्‍या ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ केंद्र सरकारद्वारे नुकताच जाहीर झाला आहे. याबद्दल केंद्रीय युवक कल्याण एवं क्रीडा मंत्रालय भारत सरकारच्या वतीने त्यांना निवडपत्र प्राप्त झालेले आहे. आंतरराष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांचा हस्ते तसेच केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार व केंद्रीय मंत्री निशीत परमाणिक यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे 12 जानेवारी रोजी होणार्‍या सोहळ्यात मिळणार आहे.

सर्वोत्कृष्ट कार्य करण्याबद्दल सन्मान
केंद्र स्तरावर दिला जाणारा राष्ट्रीय युवा पुरस्कार हा युवक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करणार्‍या युवकाला दर वर्षी दिला जातो. राजपूत सध्या नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयात नीति आयोगाच्या प्रकल्पात कार्यरत आहे. राजपूत ह्यांनी शहरात भारत सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, मतदान जनजागृती विविध सामाजिक कार्यात सक्रिय रित्या कार्य केल्यामुळे ह्या संपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. भुसावळ शहरात अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.भुसावळ शहरातील स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये त्यांनी स्वच्छतादूत म्हणून महत्वाची भूमिका बजावली तर श्रमदानातून त्यांनी खडका, किन्ही, शिवार व चोरवड नालाबांध बांधून जलसंवर्धन केले आहे. मतदान जनजागृती मध्ये दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींना मतदान करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका राबविली आहे. ह्यापूर्वी त्यांना जागतिक स्तरावर ‘ग्लोबल लिडर’ अ‍ॅवार्ड केंद्र सरकारच्या जलसंधारण मंत्रालय तर्फे ‘वॉटर हिरो’ स्वच्छ भारत अभियान मध्ये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत ह्यांच्या तर्फे स्वच्छ भारत समर इंटर्नशिप मध्ये प्रथम पुरस्कार, ‘राष्ट्रीय युवा गौरव’ अश्या विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

पुरस्काराने अधिक काम करण्यास बळ : रणजीतसिंग
माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. देशात सर्वात महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार मला जाहीर झाला याबद्दल मला खूप आनंद होत आहे. केंद्र सरकारने माझ्या कार्याची दखल घेतली ह्याबद्दल मी केंद्र सरकारचा आभारी आहे तसेच हा पुरस्काराच्या माध्यमातून ह्यापुढेही अधिक कार्य करण्याची जबाबदारी मला मिळालेली आहे आणि भविष्यात समाजहिताच्या कार्यात सातत्य टिकवून ठेवेल, असे रणजीतसिंग राजपूत म्हणाले.