रजा कॉलनीत चोरट्यांनी मांडला उच्छाद

0

जळगाव। मुलीच्या लग्नाच्या अहेरात मिळालेले 50 हजार रूपयांसह दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना रजा कॉलनीत आज रविवारी उघडकीस आली. दरम्यान, या परिसरात भुरट्या चोरांनी उच्छाद मांडला असून 15 दिवसात वेगवेळ्या घटनांमध्ये 10 मोबाईल व 15 हजार रूपयांची सोन्याची पोत चोरीस गेल्याचीही बाब समोर आली आहे. रजा कॉलनीत राहणारे निजामोद्दीन मोइनोद्दीन यांची मुलगी आसना हिचे लग्न 23 एप्रिल रोजी घरासमोरच झाले. दरम्यान, तीच्या लग्नात नातेवाईकांनी आहेरात रोख रक्कम दिली होती.

आहेराचे हे सुमारे 50 हजार रूपये त्यांनी मागच्या खोलीत एका डब्यात ठेवले होते. रविवारी पहाटे अडीच वाजता चार चोरट्यांनी निजामोद्दीन यांच्या घरात प्रवेश करून डब्यातील पैसे चोरून नेले. सर्वात मागच्या खोलीचा लोखंडी दरवाजा उघडा होता. या खोलीत चार महिला झोपल्या होत्या. चोरट्यांनी संधी साधून या खोलीत प्रवेश केला. पायाखाली खूर्ची घेऊन पडतीवरच्या डब्यांची तपासणी केली. एका डब्यात 50 हजार रूपये आढळुन आले. हे पैसे घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान, सकाळी महिला झोपेतून उठल्यानंतर त्यांना डबा खाली ठेवलेला दिसला. चौकशी केली असता त्यातील पैसे गहाळ असल्याचे समजले. निजामोद्दीन यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. त्यांच्या घराशेजारी असलेल्या मिसबाह चिकन सेंटर या दुकानाच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात दोन चोरटे दिसून येत आहेत. त्या फुटेजच्या आधारे पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, या परिसरात गेल्या पंधरा दिवसात चोरीच्या घटना घडत असून 15 दिवसात वेगवेळ्या घटनांमध्ये 10 मोबाईल व 15 हजार रूपयांची सोन्याची पोत चोरीला गेल्याचेही रविवारी समोर आले आहे.