रंगीत बॅटने आयपीएलमध्ये धमाका करणार धोनी!

0

नवी दिल्ली : एका कंपनीचा सदिच्छा दूत असलेल्या महेंद्रसिंह धोनीला आगामी आयपीएल स्पर्धेत रंगीत बॅट वापरण्याची शिफारस केली आहे. क्रीडासाहित्य बनविणाऱ्या स्पार्टन स्पोर्ट्स कंपनीने ही विनंती धोनीला केली आहे. विंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये काळय़ा रंगाची बॅट वापरली होती. नव्या स्टाईल्स व प्रथा सुरू करण्यासाठी टी-२० क्रिकेट ओळखले जाते. नव्या प्रकारचे फटके, विचित्र गोलंदाजी व रंगीत पोशाख ही टी-२० क्रिकेटचीच देणगी आहे. फ्रँचायजींच्या लीगमध्ये रंगीत बॅटेचा वापर या नव्या ट्रेंडची त्यात आता भर पडली आहे.

अनेक खेळाडूंना केले आहे करारबद्ध
विंडीजचा अष्टपैलू आंद्रे रसेलने नुकतेच बिग बॅश लीगमधील सामन्यात काळय़ा बॅटचा वापर केला होता. धोनीने आयपीएलमध्ये रंगीत बॅटचा वापर केला तर त्याचे आम्ही स्वागतच करू. तो एक आदर्श, परिणामकारक क्रिकेटपटू असून नवोदितांचे त्याच्याकडे नेहमीच लक्ष असते, असे स्पार्टन स्पोर्ट्सचे क्रिकेट व्यवस्थापक कॅमेरॉन मर्चंट यांनी म्हटल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्क, विंडीजचा ख्रिस गेल, इंग्लंडचे ऍलेस्टर कूक व इयॉन मॉर्गन, ऑस्ट्रेलियन सीमर मिशेल जॉन्सन, विंडीजचे माजी महान क्रिकेटपटू सर व्हिवियन रिचर्ड्स तसेच लंकेची महिला क्रिकेटपटू श्रीपली वीराकोडी यांनाही स्पार्टन स्पोर्ट्सने कराराबद्ध केले असून नव्या रंगीत बॅट्सचा वापर करण्याची जाहिरता त्यांच्याकडून करवून घेतली जाणार आहे. फ्रँचायजी आधारित जगभरातील सर्व टी-२० लीगमध्ये रंगीत बॅटचा वापर करण्याची परवानगी आहे.