योजनेच्या नावाखाली नागरिकांची लूट!

0

जळगाव । घरकुलात घरे मिळतील असे आमिष दाखवून पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली नागरिकांकडून १९० रुपये लाटले जात असल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी सुज्ञ नागरिकांच्या सतर्कतेने उघडकीस आला. यावेळी महिलेसह दोघांना सुज्ञ नागरिकांनी पकडून त्यांना रामानंद पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले. तर पोलीसांनी त्यांचे कॉम्प्युटरसह इतर साहित्य देखील जप्त केले आहे. दरम्यान, महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांनी मात्र महिलेसह अन्य दोघे हे मनपा कर्मचारी नसून याबाबत स्पष्ट केले असल्याने योजनेच्या नावाखाली नागरिकांची लुट करणारे तिघे कोण असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. या घटनेप्रकरणी पोलीसांकडून तिघांची कसून चौकशी सुरू आहे.

पिंप्राळा हुडकोतील जाकीर पठाण हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना दुपारी असलम शेख या नागरिकाचा फोन आला. एका महिलेसह दोन पुरूष पंतप्रधान योजनेच्या नावाखाली फॉर्म भरून घेत असून १९० रूपये घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पठाण यांनी महापालिकेतील अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकार कळविला. मात्र अधिकार्‍यांकडून योजनेबाबत कुठलेही सर्वेक्षण सुरू नसून महापालिकेचे कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले नसल्याचे सांगितले. घरांचे आमिष दाखवून योजनेच्या नावाखाली नागरिकांची लुट केली जात असल्याचे लक्षात येतात पठाण यांनी रामानंदनगर पोलिसांना प्रकार कळविले़

महिन्या भरापासून सुरू हे पैसे गोळा करणे
डॉ. साखरेशहरातील पिंप्राळा हुडकोत एका वेल्डींगच्या दुकानात तिघांनी लॅपटॉपसह आपले दुकान मांडले. यानंतर त्यांनी तेथील नागरिकांना महापालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत योजनेचे काम सुरू असून घरकुलमध्ये घर मिळत असल्याचे सांगत नागरिकांकडून अर्ज भरून घेतले जात होते. यासाठी नागरिकांकडून अर्जाचे २० रुपये तर अर्ज भरून घेण्याचे १७० रूपये असे एकूण १९० घेतले जात होते. तिघांनी महिनाभरापासून हरिविठ्ठल, खंडेराव नगर, यानंतर पिंप्राळा हुडको या परिसरात अर्ज भरण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही़ दरम्यान, त्यातील एक इसम हा काँग्रेस पक्षाचा जिल्हा सरचिटणीस असल्याचा बतावणी करत असल्याचेही समोर आले आहे.

महिलांनी तिघांना घेरले
नागरिकांकडून पैसे लूटले जात असल्याने फसवणुकीचा प्रकार असल्याचे तेथील काही सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आल्यावर सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी जावून संपूर्ण प्रकाराबाबत चौकशी करत एकच गर्दी केली व महिलेसह दोघांना घेरले. यावेळी चांगलाच जमाव जमल्याने काही जणांनी दोन्ही पुरूषांना चोप दिला. यानंतर हुडकोतील काही नागरिकांनी रामानंद पोलीसांना घडलेल्या प्रकाराविषयी दिली. माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तिघांना सोबत घेत पोलीस ठाण्यात आणले. यावेळी पोलीस ठाण्यात नगरसेवक सुरेश सोनवणे, जाकीर पठाण यांच्यासह नागरिकांनी गर्दी केली.

काँग्रेस जिल्हा सरचिटणीस असल्याची बतावणी
तिघांपैकी एकाने नागरिकांशी वाद घालत मी जिल्हा काँग्रेसचा सरचिटणीस असल्याचे सांगून हुज्जत घातल्याचेही जागीर पठाण यांनी सांगितले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर सरचिटणीस असल्याचे सांगणार्‍या एकाने मला चक्कर येत असून अस्वस्थ वाटत असल्याचे सांगितले. तर दुसर्‍यानेही अत्यवस्थ वाटत असल्याचे सांगितले. यानंतर दोघांना रिक्षातून जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. दोघांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दोघेही बनाव करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

तक्रारदारांची पोलीस ठाण्यात गर्दी
फसवणूकीच्या प्रकार असल्याचे समजताच पिंप्राळा हुडकोतील अर्ज भरून घेतलेल्या नागरिकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गर्दी केली. अशफाक शेख, अजगर अली, इमरान शेख, फिरोज खान, विलास सुरवाडे, जय सोनवणे, दिपक भालेराव, हकीकहुल्ला खान, शेख साबीर शेख करीम, ईस्माईल खान, शेख सईद शेख शब्बीर, दस्तगीर खान, इकबाल शेख आरिफ हे तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
याप्रकरणी उशीरापर्यंत पोलिसांची चौकशी सुरू होती. दरम्यान, मनपा अधिकार्‍यांशी संपर्क झाल्यानंतर मनपा कर्मचारी असल्याचे विचारले असता त्यांनी तिघे मनपा कर्मचारी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.