योजनांची माहिती देण्याची गरज

0

भुसावळ : बहुतांश आजार हे अस्वच्छतेमुळे उद्भवतात त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज असून स्वच्छता अभियानासह शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी तलाठी, ग्रामसेवकांनी विशेष प्रयत्न करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी केल्या. येथील आयएमए सभागृहात शासनाच्या विविध योजनांची माहिती व त्याचे कार्यवृत्तासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, उपकार्यकारी अधिकारी राजन पाटील, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी मिनल कुटे, सहाय्यक प्रकल्प संचालक शिरसाठ, तहसिलदार मिनाक्षी राठोड, मुक्ताईनगर तहसिलदार जितेंद्र कुंवर, बोदवड तहसिलदार भाऊसाहेब थोरात उपस्थित होते.

योजनांचा लाभ मिळवून द्या
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शासनाच्या विविध योजनांसंदर्भात माहिती दिली. यामध्ये स्वच्छ भारत अभियान, आधार नोंदणी, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, तसेच मनरेगा अंतर्गत अकरा कलमी कार्यक्रमात अंकुर रोपवाटीका, निर्मल शोषखड्डा, कल्पवृक्ष फळ लागवड, भूसंजीवनी, अमृतकुंड शेततळे, निर्मल शौचालय, समृध्द गाव समृध्द तलाव, नंदनवन वृक्ष लागवड आदी योजनांचा समावेश असून या योजनांची माहिती देवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्या पोहचविण्याचे आवाहन केले.

मानसिकता बदलण्याची गरज
प्रथमच देशात दोन हजार रुपयांच्या नोटवर स्वच्छ भारत अभियानाचे संकल्पचित्र आहे. त्यामुळे याचा मान राखून तरी आपण या अभियानाला यशस्वी बनविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी केले. त्यामुळे शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण अगोदर मानसिकता बदलण्याची गरज असून नागरिकांना जागृत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

गाव कॅशलेस होण्याची आवश्यकता
तलाठी व ग्रामसेवकांनी आपल्या नातेवाईकांना शेजारच्यांना माहिती द्यावी शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त करावे, तसेच महिलांवरील सर्वाधिक अत्याचार हे उघड्यावर शौचास बसण्यावरुन झालेले आहेत. ग्रामीण भागात महिलांना रात्री अपरात्री बाहेर उघड्यावर शौचास जावे लागते. मात्र याचा गैरफायदा घेऊन बलात्काराच्या घटना झालेल्या आहेत. त्यामुळे घरोघरी शौचालय उभारण्यास प्रवृत्त करण्याच्या सुचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्या. यासह मागेल त्याला शेततळे या योजनेला देखील फारसा प्रतिसाद मिळत नसून जळगाव विभागात 200 भुसावळात 5, बोदवड 4, मुक्ताईनगर 3 इतकेच प्रस्ताव आलेले आहेत यासाठी देखील प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.
सरकार कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देत आहे. मात्र याबाबत विविध प्रकारचे संभ्रम निर्माण केले जात असून हे संभ्रम दूर करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ग्रामसेवक व तलाठी यांचा गावातील नागरिकांशी संपर्क येत असतो यावेळी अगोदर आपण कॅशलेसची यंत्रणा समजून घेतल्यास दुसर्‍यांना याची माहिती देवू शकतो. कॅशलेस व्यवहारामध्ये ई- बँकिंग, मोबाईल व्हॉलेट असे विविध प्रकार येतात. समजून घेतल्यास ते हाताळणे सहज शक्य आहे. यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक बँकेत नोंद करण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्मार्ट फोनची गरज नाही साध्या मोबाईलवर देखील आपण स्टार 99 हॅश दाबून ऑनलाईन व्यवहार करु शकतो. तसेच दुकानदारांची बैठक घेवून त्यांना देखील स्वाईप मशिन बसवून याबाबत प्रवृत्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी
अग्रवाल यांनी केले.