योग प्राणायाम शिबिरास लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

भुसावळ । येथील वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघातर्फे भुसावळ हायस्कुलच्या पटांगणावर निःशुल्क योग प्राणायाम शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन नगरपालिका बांधकाम समिती सभापती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डी.एन. ढाके, योग प्रशिक्षक वसंत बळेल यांची उपस्थिती होती. यावेळी महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेस प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या शिबिरात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसह तरुण, तरुणींची उपस्थिती लाभली.

यावेळी योग प्रशिक्षक वसंत बळेल यांनी हात, पाय व मान यांचे विविध व्यायाम प्रकार करुन दाखविले व साधकांकडून करवून घेतले. तसेच जीवनात निरोगी आयुष्यासाठी प्राणायामाचे असलेले महत्व सांगून प्राणायाम संदर्भात प्रात्याक्षिक करुन दाखविले. या शिबिरात 75 पुरुष व महिला योग साधकांची उपस्थिती होती. नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी साधकांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक जिवराम चौधरी यांनी तर आभार मेघश्याम फालक यांनी मानले. यावेळी लिना जावळे, माजी नगरसेवक वसंत पाटील, सिताराम भंगाळे आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सपकाळे गुरुजी, एस.जी. भारंबे, वाढे, वसंत चौधरी तसेच ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभासदांनी परिश्रम घेतले.