ये पब्लिक है सब जानती है!

0

सार्वजनिक जीवन खडतर तर सत्ता ही उबदार देणगी असते, सत्येचे लाभ आणि नुकसान असतातच मात्र सत्ताधारी व्यक्तीला केवळ लाभच दिसतात. सत्ताधारी व्यक्तीचे एक कान आणि एक डोळा हे अवयव निकामी होतात असे केशवराव धोंडगे नेहमी म्हणायचे. सत्ताधारी व्यक्तीला नेहमी चांगले दिसते, वाईट त्याच्या नजरेस पडत नाही आणि कुणी कितीही पोटतिडकीने चुका सांगायला लागले की ते ऐकूच येत नाही, चुका दाखविणारा विरोधी कळपात तर सामील झाला नसावा अशी कायम शंका त्यांना येत असते. आपण जे काही करतो आहोत तेच अंतिम सत्य आणि लोकांच्या कल्याणाचे आहे याची खात्री त्यांना पटलेली असते. सत्ताधारी व्यक्तीचे अनेक हितचिंतक असतात परंतु त्यांच्या तोंडून स्तुतीऐवजी सत्य किंवा वास्तव बाहेर पडले की असे हितचिंतक त्याच्या गुडबुक मधून बाहेर काढले जातात. सत्ता कोणतीही असो गल्ली ते दिल्ली हेच समीकरण तिला आजवर लागू पडत आले आहे.

सार्वजनिक जीवन आणि सत्ता यामध्ये काही बाबतीत साम्य असले तरी दोघांच्या लाभात मात्र जमीन अस्मानाचे अंतर असते. सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग नक्कीच सार्वजनिक जीवन असते यात शंका नाही, आपल्याकडे सार्वजनिक जीवनाच्या विविध तर्‍हा बघायला मिळतात. उत्पन्नाचे साधन, छंद, तात्विक भूमिका किंवा ध्येयप्राप्तीसाठी याचा वापर करताना लोक आपल्याला दिसतात. विविध क्षेत्रातल्या चळवळीत काम करणारे सगळे कार्यकर्ते तत्वासाठी कार्यरत असले तरी त्यातही कमाई करणारा मोठा वर्ग याकाळात तयार झाला आहे. जे निश्चित ध्येय ठेवून नियोजनबद्ध कामाला सुरुवात करतात आणि अपेक्षित वेळेवर ते गाठतात त्यांच्यातही दोन प्रवाह दिसतात. तत्वनिष्ठ आणि तत्वाला तिलांजली देणारा यात तत्वांचा सतत जप करणार्‍याला राजकारणात लवकर पायर्‍या गाठणे शक्य होते आणि ध्येयाचे तुणतुणे वाजविणारा काळाच्या प्रवाहात कधी बाहेर फेकला जातो हे त्यालाही कळत नाही, ही मोठी गम्मत असते.
सार्वजनिक जीवन खडतर तर सत्ता ही उबदार देणगी असते, सत्येचे लाभ आणि नुकसान असतातच मात्र सत्ताधारी व्यक्तीला केवळ लाभच दिसतात. सत्ताधारी व्यक्तीचे एक कान आणि एक डोळा हे अवयव निकामी होतात असे केशवराव धोंडगे नेहमी म्हणायचे.सत्ताधारी व्यक्तीला नेहमी चांगले दिसते, वाईट त्याच्या नजरेस पडत नाही आणि कुणी कितीही पोटतिडकीने चुका सांगायला लागले की ते ऐकूच येत नाही, चुका दाखविणारा विरोधी कळपात तर सामील झाला नसावा अशी कायम शंका त्यांना येत असते. आपण जे काही करतो आहोत तेच अंतिम सत्य आणि लोकांच्या कल्याणाचे आहे याची खात्री त्यांना पटलेली असते. सत्ताधारी व्यक्तीचे अनेक हितचिंतक असतात परंतु त्यांच्या तोंडून स्तुतीऐवजी सत्य किंवा वास्तव बाहेर पडले की असे हितचिंतक त्याच्या गुडबुक मधून बाहेर काढले जातात. सत्ता कोणतीही असो गल्ली ते दिल्ली हेच समीकरण तिला आजवर लागू पडत आले आहे.
भाजप सरकार सध्या जे काही करीत आहे त्यालाही वरील संदर्भ लागू होतात. शिव स्मारक भूमिपूजनाच्या निमित्याने ज्या नाटकबाज्या भाजपने केल्या त्यातून मुंबई महापालिका गाठू शकू हे त्यांना सत्य वाटतेय, त्यात चुका दाखविणारे तर घोरपापी समजले जात आहेत. सरकारी खर्चाने मोठा इव्हेन्ट घडवून आणल्यावर मुंबईकर नक्कीच महापालिका भाजपच्या ताब्यात देतील अशी स्वप्ने दिवसा पाहण्याचा भाजपला नक्कीच अधिकार आहे पण सामान्य जनता महागुरू आहे हे अनेकदा सिद्ध झाले आहे. नाटक आणि वास्तव यातला उत्तम फरक जनतेला कळतो, कोणाचे, कसे, कोणते उद्देश दडलेले आहेत, त्याचे आपल्यावर काय परिणाम होतील याची हिशेबी जाणीव लोकांना नसते असा कायम समज सत्ताधारी करून बसतात हे भाजपने आणखी एकदा सिद्ध केले आहे.
राज्यातले सारे प्रश्न शिवाजी महाराजांच्या भोवती फिरवत ठेवून वातावरण भगवे केले की लोक कसे निमूटपणे सगळे स्वीकारतात हा भ्रम दिसतो आहे.
जलपूजन, मातीपूजन, अभिषेक हे सगळे भाजपचे आवडीचे विषय आहेत. त्याच्या आभासावर अनेक निवडणुका सुद्धा काढल्या जातात याची चटक लागलेला भाजप श्रेयाचे भयंकर आणि घाणेरडे राजकारण करून काही नवे पायंडे निर्माण करीत आहे, आपण काही चुकीचे करतो आहोत याचा मागमूसही कुणा नेत्याच्या चेहर्‍यावर दिसत नाही. ज्यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजले जाते त्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सोहळ्याचा काय गोंधळ होता . स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांना केवळ नामधारी ठेवले गेले, घटक पक्षाच्या कुणा नेत्यांना विचारले जात नाही, मनसे आपल्या भितीवरील मजकूर काय पुसून टाकते? ही साठमारी नेमकी कशासाठी चालली आहे? याचा उलगडा सामान्य माणसाला होत नसेल या भ्रमात कुणी राहू नये लोकांना सगळे कळते आहे, फक्त कधी बोलायचे हे लोक ठरवीत असतात.

समुद्रात होणार्‍या स्मारकाला विरोध करणारे कोळी बांधव आणि मराठा सेवा संघ यांना तर कधीच शिवद्रोही ठरवण्यात आले आहे. कोळी नेते दामोधर तांडेल आणि पुरुषोत्तम खेडेकर नक्कीच वेडे नाहीत आपण काय करतोय याची त्याना उत्तम जाणीव आहे, खेडेकरांनी तर विविध वर्तमानपत्रामधून लेखाच्या माध्यमातून आपली भूमिकादेखील मांडली आहे पण त्यांचेशी चर्चा करून सत्ताधार्‍यांना वेळ गमवायचा नाही हेच यातून दिसून येते. ज्यांनी शिवाजी राजांना जिवंतपणी वैदिकत्व नाकारले तेच आता त्यांचे वैदिकीकरण करण्यात गुंतले आहेत, पूजन, अभिषेक, मंत्रोच्चरण हे सगळे काय होते? असा प्रश्न विचारण्याची सोय नाही.विनायक मेटे आधीच मंत्रिपदापासून बेदखल केले आहेत आता गरज संपल्यावर स्मारक समितीच्या अध्यक्ष पदावरूनही त्यांना जय महाराष्ट्र म्हटले जाऊ शकते, मात्र पाठीचा कणा हरवला की काय होऊ शकते याचा अनुभव मेटेंना विचारला पाहिजे.

पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248