‘येसूबाई’ ऐतिहासिक कादंबरीचे रोटरी भवनात प्रकाशन!

0

जळगाव । येथील लेखिका सुलभा राजीव यांनी हिंदवी स्वराज्याची पहिली युवराज्ञी महाराणी येसूबाई यांच्या जीवनावर लिहिलेल्या ऐतिहासिक कादंबरीचे गुरूवारी रोटरी भवन येथे प्रकाशन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शरदचंद्र छापेकर, नाशिक येथील सेवानिवृत्त एल.आय,सी. अधिकारी सुरेश दाजी जोशी, सुरत येथील मंदाताई दंडवते तर अध्यक्षस्थानी जळगाव जनता सहकारी बँक लि.चे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव हे होते.

लिखाणात नाविन्य, ताजेपणा
प्रास्ताविक लेखिका सुलभा राजीव यांनी केले. प्रमुख पाहुणे शरदचंद्र छापेकर यांनी सांगितले की, ऐतिहासिक कादंबरीला स्वतःचा असा एक बाज असतो. त्याला साजेसे सुलभा राजीव यांनी लिखाणाचे नाविन्य व ताजेपणा तसाच टिकून राहतो. केवळ लिखाणच नव्हे तर या कादंबरीसाठी तांत्रिक बाजूंचीही तेवढीच मदत झालेली असून, सुपरप्रिंटचे कुरंभट्टी यांनी मुद्रणासाठी तर योगेश शुक्ल यांनी विचारपूर्वक मुखपृष्ठ बनविण्यासाठी घेतलेली मेहनत जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.

अवघड कोडे सोडविले
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अनिल राव म्हणाले की, ऐतिहासिक पार्श्‍वभूमीवर आजच्या परिस्थितीत कादंबरी लिहिणे तसे धाडसाचेच काम म्हणावे लागेल. पण आज प्रत्यक्षात ही कादंबरी पाहताना हे ‘येसूबाई’वरील अवघड कोडे सुलभा राजीव यांनी सोडवले आहे असेच म्हणावे लागेल. सुलभा राजीव जळगाव जनता सहकारी बँकेच्या कर्मचारी असल्याने, त्यांचा एकंदरीत सांस्कृतिक – साहित्यिक प्रवासाचा मी एकप्रकारे साक्षीदारच आहे.

यांनी पाहिले कामकाज
सूत्रसंचालन गिरीष कुळकर्णी यांनी तर आभार केतकी कुळकर्णी यांनी मानले. प्रकाशन सोहळ्याच्या अखेरीस ‘येसूबाई’ या कादंबरीतील तीन निवडक प्रसंगांचे राजीव कुळकर्णी, योगेश शुक्ल, श्रध्दा पाटील – शुक्ल व रसिका मुजूमदार यांनी अभिवाचन सादर केले. या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती लाभली असल्याने, प्रॉलिफिक प्रकाशनातर्फे राजीव कुळकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.