येशू जन्मोत्सवासाठी सजले चर्च

0

भुसावळ : नग शहरात नाताळनिमित्त विविध चर्च रंगरंगोटी तसेच विद्युत रोषणाई करून सजविण्यात आले आहेत. नाताळ या सणाला ख्रिस्ती समाजबांधवांमध्ये अनन्यसाधार महत्व आहे. यानिमित्त ख्रिस्ती बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून रविवार 25 रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात एकूण सहा चर्च असून रेल्वेतील नोकरी व व्यवसायानिमित्त भुसावळला वसलेले सुमारे तीनशे ख्रिश्‍चन कुटुंब नाताळसाठी सज्ज झाले आहेत. नाताळनिमित्त काही ठिकाणी येशुच्या जन्माचे देखावे सादर करण्यात आले आहे. तसेच विशेष आकर्षण असलेले ख्रिसमस ट्री सजविण्यात आले आहे. तर काही चर्चमध्ये चित्रांच्या माध्यमातून येशू ख्रिस्तांच्या जीवनपट साकारण्यात आला असून चर्चमध्ये येणार्‍या समाजबांधवांसाठी या बाबी आकर्षण ठरतील. रेल्वे रुग्णालयाजवळील हिंदी चर्च, रेल्वे स्थानकाजवळील चर्च, डीआरएम कार्यालयाजवळील मराठी चर्च, गार्ड लाईनमधील कॅथलिक चर्च, एजीसी स्कुलजवळील चर्च आणि मुख्य टपाल कार्यालयाजवळ एक मराठी असे सहा चर्चमधुन ख्रिश्‍चन बांधव प्रभू येशुची उपासना करतात.

मध्यरात्री करणार प्रार्थना
प्रत्येक चर्चची देखभाल फादर (पुजारी व मार्गदर्शक) यांच्याद्वारे केली जाते. ख्रिस्त जन्मासाठी आज रात्री 11 वाजेपासुन मध्यरात्रीनंतर दोन वाजेपर्यंत प्रार्थना तसेच उद्या (ता. 25) सकाळी 8.30 वाजता कॅथलिक चर्चमध्ये प्रार्थना केली जाणार आहे. तसेच 1 जानेवारीपर्यंत खेळ स्पर्धा, संडे स्कूल कार्यक्रम, चर्च पिकनिक, चित्रकला स्पर्धा, मंडळाचे प्रीती भोजन व नवीन वर्ष उपासना असे कार्यक्रम होणार आहेत.

रविवारी सकाळी होणार विशेष उपासना
अलायन्स मराठी चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव व येणारे नूतन वर्ष 2017 सर्वांना सुखाचे, आनंदाचे व भरभराटीचे जावो यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. येथे 18 डिसेंबरपासून प्रभुवार उपासना, कॅरल सिंगींग, चर्च स्वच्छता व डेकोरेशन असे विविध कार्यक्रम करण्यात आले. उद्या सकाळी नऊ वाजता होणार्‍या विशेष उपासनेचे चालक जॉन जे. रंगारे व संदेश पास्टर स्वप्नील नाशिककर देणार आहेत.

नाताळ भक्ती संदेश
त्याचप्रमाणे संत पॉल चर्चमध्ये उद्या नाताळ भक्ती संदेश प्रसारित केला जाणार आहे. या चर्चमध्ये सात डिसेंबरपासूनच श्रमदान आणि इतर विधींना सुरवात झाली आहे. तसेच यापुढे फॅन्सी ड्रेस, कँडल लाइट सर्व्हिस आदी कार्यक्रम रेव्ह. पी. वाय. घुले, विनीत केकाल व सभासद सादर करणार आहेत.