युवकांनी भारतीय संस्कृतीच्या परंपरेला साजेसे आचरण ठेवल्यास देशाची प्रतिमा उंचावेल

0

प.पू.युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांचे मत

शरद भालेराव, जळगाव: आजच्या युवा पिढीच्या रहाण्यातून, वागण्यातून चित्रपट क्षेत्राचा मोठा परिणाम दिसून येतो. त्यांचे कपडे परिधान करणे, बोलणे, खानपान, त्यांचा मोठ्यासह लहानांशी जो व्यवहार आहे याबाबतीत अनेक फरक दिसून येतात. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीच्या परंपरेला साजेसे असेच आचरण ठेवल्यास निश्‍चितच आपण आपल्या उच्च मुल्यांचा वारसा पुढे चालविता येईल. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जगात आपल्या देशाची विशिष्ट प्रतिमा उंचावता येईल. आज चांगले सांगणेही अनेकांना पचनी पडत नाही. त्यामुळे त्यांना असे वाटते की, आमच्या स्वातंत्र्यावर हल्ला होत असल्याचे युवापिढीला वाटते. ‘ज्याचे करावे भले, तोच म्हणतो माझे खरे’ त्यामुळे शब्दांना सिमीत भाषेतच सांगणे योग्य ठरते, असे मत प.पू.युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांनी व्यक्त केले. ते एमआयडीसीतील जैन भवनात दै.‘जनशक्ती’चे उपसंपादक शरद भालेराव यांनी तयार केलेल्या ‘महावीर वाणी’ या 96 भागांचा संच संकलन करुन त्याची पुस्तकरुपी भेट देतांना बोलत होते.

युवकांच्या आदर्शाचे मानदंड बदलले
आजच्या युवकांचे ‘आयकॉन’ आदर्शाचे मानदंड बदलले आहेत. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री, डॉ.राजेंद्र प्रसाद, स्वामी विवेकानंद अशा अनेक राष्ट्रमान्य व्यक्तीचे आदर्श युवा पिढीसमोर होते. त्यामुळे त्यांच्या राहण्यात, वागण्यात एक साधेपणा दिसून येत होता. आजच्या दृश्य माध्यम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जे नवीन मापदंड तयार होत आहेत. त्यात अधिक करुन चित्रपट क्षेत्राशी संबंधित अशा व्यक्तींचा आदर्श
युवापिढीसमोर तयार होत आहे.

युवापिढीच देशाची प्रतिमा उंचावतील
कोरोना काळात तामसी, राजसी पदार्थ खाणे टाळायला हवे, मानसिक संतुलनासाठी चांगले विचार आणि सात्विक जीवन असलेल्या वातावरणात जास्तीत जास्त वेळ घालविणे, नकारात्मक विचार जेथून येतात, नकारात्मक शक्तींना जेथून जास्त अशी साथ मिळते. अशा वातावरणात न जाता व्यसनांपासून मुक्त राहून सद्साहित्य आणि सज्जन संगतीत जास्तीत जास्त राहिलो तर आपले मानसिक सामर्थ्य, मनोबल निश्‍चित सुदृढ राहील. मनोबल आणि शारीरिक बल या दोन्ही गोष्टी कोरोना काळात सांभाळणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगले खाणे, पिणे, चांगले विचार, चांगले रहा, असे मतही प.पू.युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांनी दै.‘जनशक्ती’जवळ व्यक्त केले.

‘जनशक्ती’च्या टीमचेे कार्य अतुलनीय
आजच्या जनमानसाच्या जागृतीसाठी वृत्तपत्राचा खूप मोठा वाटा आहे. त्यातच ‘जनशक्ती’च्या
माध्यमातून जळगाव प्रवासातील विचारांना, भावनांना आणि आमच्या माध्यमातून प्रभु महावीर भगवान यांच्या संदेशाला ‘महावीर वाणी’द्वारे जनमाणसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य जे केलेले आहे. अशा ‘जनशक्ती’च्या टीमने केलेले कार्य खरोखर वाखाणण्या योग्य तसेच अतुलनीय असे ठरले आहे. वृत्तपत्रातून जी ‘महावीर वाणी’ प्रकाशित झाली. त्यासाठी जैन इरिगेशनचे किशोर कुळकर्णी यांनी अतोनात परिश्रम घेतले. तसेच ‘जनशक्ती’चे उपसंपादक शरद भालेराव आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ‘महावीर वाणी’चा पाठपुरावा करुन ज्या पध्दतीने त्याला निरंतर जवळपास शतकापर्यंत पोहोचविले. अशा विचारांना जनमाणसापर्यंत पोहोचवून त्यांच्यातील सकारात्मक शक्ती जागृत करण्याचा जो प्रयत्न ‘जनशक्ती’च्या माध्यमातून घडला आहे, तो खरोखर आदर्श असा उपक्रम आहे. महावीर वाणीच्या 96 प्रवचनांना एक असे संकलित रुप, छान असे रुप जे देण्यात आलेले आहे. त्यासाठी त्यांना खूप-खूप साधुवाद. हे कार्य ‘जनशक्ती’च्या टीमला तसेच स्वतःला आणि जनमाणसाला सतत प्रेरक ठरणारे राहील. ‘जनशक्ती’च्या माध्यमातून चांगले विचार हे निश्‍चितच समाजाला पुढे नेतात. समाजाला सुसंस्कृत बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी ‘जनशक्ती’चा हा उपक्रम स्तुत्य असल्याचेही प.पू.युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज म्हणाले.

Copy