युपीतला ‘यू टर्न’! अखिलेश, रामगोपाल यादव यांचे निलंबन रद्द

0

लखनऊ : समाजवादी पक्षात कालपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला आज अकस्मात नाट्यमय वळण लागले. काल मुलायमसिंग यादव यांनी आपले पुत्र तथा युपीचे मुख्यमंत्री अखिलेश आणि बंधू तथा राज्यसभा सदस्य रामगोपाल यादव यांना सहा वर्षांसाठी निलंबीत केले होते. मात्र आज पक्षातील बहुतांश आमदार आणि प्रमुख नेते आपल्या मुलासोबत असल्याचे पाहून मुलायम यांनी नरमाईचे धोरण स्वीकारत अखिलेश आणि रामगोपाल यांचे निलंबन मागे घेतले. यासाठी समाजवादी पक्षातील मातब्बर नेते आझम खान यांनी महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान, या निर्णयाबाबत शिवपाल यादव यांनी पडद्याआड जोरदार आगपाखड केल्याचे माहिती समोर आल्याने समाजवादीतील सत्तासंघर्ष संपलेला नसल्याचे दिसून आले आहे.

अखिलेश यांचे शक्ती प्रदर्शन

आज मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांनी आपाल्या समर्थकांची बैठक घेतली. यात अखिलेश यादव यांच्या बैठकीला पक्षाच्या 228 पैकी तब्बल दोनशेपेक्षा जास्त आमदारांनी हजेरी लावली होती. यातील चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी सर्व आमदारांनी अखिलेश यांच्यासोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. तर मुलायम यांच्याकडे फक्त 18 आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर अखिलेश यादव हे मुलायमसिंह यादव यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. या वेळी अखिलेश यांचे काका व प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव, आझम खान आदी उपस्थित होते. या बैठकीत अखिलेश व मुलायमसिंह यांच्यात ज्या मुद्यावर वाद होता त्या जागा वाटपााबाबत चर्चा झाली. अखिलेश यांचे काका खासदार रामगोपाल यादव यांचेही निलंबन मागे घेण्यात आले आहे.

शिवपाल यांनी केली घोषणा

बैठकीनंतर शिवपाल यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव यांच्या आदेशानुसार अखिलेश यादव व रामगोपाल यादव यांचे निलंबन ताबडतोब मागे घेत असल्याचे सांगितले. आम्ही सर्वजण मिळून देशातील सांप्रदायिक शक्तींविरोधात लढू आणि उत्तर प्रदेशमध्ये पूर्ण बहुमत मिळवून सरकार बनवू असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी अखिलेश यांच्यावरील निलंबन मागे घेतल्याने आनंद झाल्याचे म्हटले. अखिलेश आणि मुलायमसिंह एकत्रित बसून उमेदवारांची यादी तयार करतील असेही त्यांनी या वेळी सांगितले. जाहीर झालेल्या उमदेवारांची यादी रद्द करून लवकरच नवीन यादी जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येते.

शिवपालांची आदळआपट
आज शिवपाल यादव यांनीच निलंबन रद्द झाल्याची घोषणा केली असली तरी ते नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. निलंबन नाट्यामुळे समाजवादी पक्षाच्या इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी मुलायमसिंग यांच्यासमोर व्यक्त केल्याचे माहिती नंतर समोर आली आहे. दरम्यान, आजच्या नाट्यात आझम खान तसेच राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी सलोखा होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याची माहितीदेखील मिळाली आहे. लालूंनी या सलोख्यावर जाहीररित्या आनंद प्रकट केला आहे. तर दुसरीकडे आज दिवसभरातील घटना शिवपाल यादव आणि अमरसिंग यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करणार्‍या असल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे.